माहीने जय भानुशालीकडून मागितली इतक्या कोटींची पोटगी? अखेर सत्य आलं समोर
लग्नाच्या 14 वर्षांनंतर अभिनेता जय भानुशाली आणि माही विज विभक्त झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना माहिती दिली होती. त्यानंतर माहीने त्याच्याकडून कोट्यवधी रुपये पोटगी घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं. यावर खुद्द माहीने प्रतिक्रिया दिली आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. या दोघांना तीन मुलं असून त्यापैकी दोघांना त्यांनी दत्तक घेतलं होतं. घटस्फोटानंतरही तिन्ही मुलांचं संगोपन दोघं मिळून करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. यादरम्यान माहीने जयकडून कोट्यवधी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर अखेर माहीने तिच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग पोस्ट करत उत्तर दिलं आहे. माहीने जयकडे पाच कोटी रुपयांची पोटगी मागितल्याची चर्चा होती. परंतु या चर्चा खोट्या असल्याचं माहीने स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाली माही?
“अर्धवट माहितीमधून गोष्टी पसरवू नका. माहीने जयकडून पोटगी म्हणून 5 कोटी रुपये घेतले, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. फक्त लाइक्स आणि कमेंट्ससाठी आमच्या जुन्या मुलाखती काढून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. हे खूपच दु:खद आहे. मला मान्य आहे की आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्यामुळे लोकांना आमच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. पण हे सर्व करण्याची गरज नाही. घटस्फोटानंतर मी काहीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं तरी त्याचा संबंध जयशी जोडला जातोय. 14 वर्षांच्या संसारानंतर आम्ही घटस्फोट का घेतला, यामागचं कारण लोकांना माहीतसुद्धा नाही. तरीही त्यावर टिप्पण्या दिल्या जात आहेत,” अशा शब्दांत माहीने राग व्यक्त केला.
जयविषयी ती पुढे म्हणाली, “जय हा माणूस म्हणून खूप चांगला आहे, त्याचं मन खूप चांगलं आहे, फक्त आमच्यात काही गोष्टी ठीक चालल्या नाहीत, म्हणून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचा तितकाच आदर करतो. अनेकजण म्हणतायत की, हा ड्रामा आहे, मस्करी आहे. त्यांना मी सांगू इच्छिते की, हा काही ड्रामा नाही. कोणालाच घटस्फोट घ्यायला आवडत नाही. देव न करो की तुमच्या घरात काही असं घडो. ज्याच्यासोबत घडतं, त्यालाच त्याचं दु:ख कळतं.”
माही आणि जय यांनी त्यांच्या नात्यासाठी बराच वेळ देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतरही सर्वकाही सुरळीत न झाल्याने त्यांनी अखेर शांततापूर्ण मार्गाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जयपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिच्या तारा, खुशी आणि राजवीर या तीन मुलांसाठी कोणताही पोटगीची किंवा देखभालीसाठीची रक्कम स्वीकारलेली नाही. घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने होता, म्हणून दोघांनी कोणत्याही वादविवादाशिवाय नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
