‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; येणार 7 वर्षांचा लीप, रमा-अक्षयच्या आयुष्यात घडणार या मोठ्या गोष्टी
'मुरांबा' या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. 'मुरांबा'मधील शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. आता या नव्या कथानकाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेनं नुकताच 1100 भागांचा टप्पा पूर्ण केला. या प्रवासात मालिकेच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. रमा-अक्षयची जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधितच लोकप्रिय झालं. आता लवकरच या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. या सात वर्षांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले. तर तिकडे इरावती आपल्या सुडबुद्धीने संपूर्ण मुकादम कुटुंबाला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यात अक्षयच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देणारी एकमेव घटना म्हणजे रमा आणि त्याची लाडकी लेक आरोही. अतिशय गोड, चुणचुणीत, बडबडी आणि हसरी असणारी आरोही रमा आणि अक्षयला एकत्र आणणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
बालकलाकार आरंभी उबाळे आरोहीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुरांबामध्ये सुरु होणाऱ्या या नव्या अध्यायाविषयी सांगताना अक्षय म्हणजेच शशांक केतकर म्हणाला, “आमच्या मालिकेनं 1100 भागांचा टप्पा गाठलाय आणि हा प्रवास सुसाट सुरु आहे. जोवर वाहिनी, लेखक आणि दिग्दर्शकांना गोष्टीमध्ये क्षमता दिसते, तोवर ती गोष्ट रंगवत राहंणं हेच खरं कौशल्य असतं. याचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे.
View this post on Instagram
“आपल्या आयुष्यात जसे वेगवेगळे टप्पे येत असतात, त्याप्रमाणे मालिकेतही वेगवेगळी वळणं येतात. रमा-अक्षयचं एकत्र येणं, त्यांचं प्रेम, त्यांची भांडणं हे सारं आपण अनुभवलं. आता त्यांच्या आयुष्यात एक चिमुकली देखील आहे. मुरांबा ही माझ्या आयुष्यातली जास्त भागांची मालिका आहे. याआधी इतक्या भागांची मालिका आणि इतक्या मोठ्या मुलीचे वडील मी कधीही साकारलेलं नाही, त्यामुळे वेगळा अनुभव आहे. खऱ्या आयुष्यात देखील मी वडील असल्यामुळे सीन करताना माझ्यातला बाप डोकावत असतो. प्रेक्षकांना मालिकेतलं हे नवं वळण पहाताना नक्की मज्जा येईल याची खात्री आहे,” असा विश्वास त्याने व्यक्त केला. ‘मुरांबा’ ही मालिका दुपारी 1.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मुरांबा’मधील रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची मालिका ठरली आहे. शशांकने याविषयी आनंद व्यक्त केला आहे.
