इंडस्ट्रीत काम मिळवणं कठीण, असं का म्हणाली ‘जवान’ फेम अभिनेत्री? News9 Global Summit मध्ये खुलासा
'न्यूज 9 ग्लोबल समिट'च्या विशेष सेगमेंटमध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी भाग घेतला. यावेळी अभिनेत्री रिधी डोग्रासुद्धा उपस्थित होती. या कार्यक्रमात रिधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. यासोबतच तिच्यासाठी सर्वांत आव्हानात्मक काम कोणतं आहे, हे देखील तिने सांगितलं.

‘न्यूज 9 ग्लोबल समिट 2025’च्या ‘स्ट्रीमिंगस्टार्स स्क्रीमिंग सक्सेस’ या विशेष सेगमेंटमधील पॅनल चर्चेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. यावेळी रिधी डोग्रा, विनीत कुमार सिंह, ताहा शाह बादशाह आणि डॉ. सना साजन यांची विशेष उपस्थिती पहायला मिळाली. हे सर्वजण त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या भविष्यातील प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेली अभिनेत्री रिधी डोग्राने तिच्या कामातील आव्हानांबद्दल सांगितलं. त्याचसोबत येत्या काळात तिचे कोणकोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, याविषयीही तिने माहिती दिली.
‘न्यूज 9 ग्लोबल समिट’दरम्यान रिधी डोग्राला तिला माहीत असलेल्या आणि तिने केलेल्या विविध कामांपैकी तिला सर्वांत आव्हानात्मक काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “कामाच्या बाबतीत फारशी आव्हानं नव्हती. ही आव्हानं खरंतर बाह्य होती, असं मला वाटतं. कारण तुमच्यातील प्रतिभा पाहू शकणारे लोक शोधणं कठीण होतं. एक कलाकार म्हणून आपण निवडक असू शकत नाही. आपल्याला सर्वकाही करावं लागतं. त्यामुळे माझ्यासाठी आव्हान हे नेहमीच बाह्य होतं. काम मिळवणं हे सर्वांत मोठं आव्हान होतं.”
गेल्या काही काळात रिधीने अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. तिच्या अभिनयाला केवळ चित्रपटांमध्येच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगली पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमात रिधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल म्हणाली, “सध्या माझ्याकडे असुरचा तिसरा सिझन आहे, कुलचा दुसरा सिझन आहे. काही चित्रपटसुद्धा आहेत, ज्यांच्याबद्दल मी आता थेट काही सांगू शकत नाही. शिवाय काही ओटीटी सीरिजसुद्धा आहेत. टीव्हीवरील प्रोजेक्ट्सच्याही ऑफर्स मला मिळत आहेत. पण मला एकाच गोष्टीपुरतं मर्यादित राहायचं नाहीये. मला विविध क्षेत्रात खूप काही काम करायचं आहे ”
रिधी डोग्राने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून केली. त्यापूर्वी ती कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स इन्स्टिट्युटमध्ये डान्सर होती. तिने ‘नच बलिए’च्या सहाव्या सिझनमध्येही भाग घेतला होता. ‘सावित्री’, ‘दिया और बाती हम’, ‘वो अपना सा’ यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. 2011 मध्ये तिने अभिनेता राकेश बापटशी लग्न केलं होतं. परंतु 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. रिधी ही भाजपचे दिवंगत नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भाची आहे.
