मुख्य अभिनेत्री ते थेट बॅकग्राऊंड एक्स्ट्रा? ‘परम सुंदरी’मध्ये नॅशनल क्रशला पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'परम सुंदरी' या चित्रपटातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मुख्य कलाकारांच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये दिसणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यातील गाणी आधीच तुफान हिट झाली आहेत. आता या चित्रपटातील एक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ‘नॅशनल क्रश’ मानल्या जाणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला बॅकग्राऊंड एक्स्ट्रामध्ये पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ‘विंक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रिया प्रकाश वारियर आहे. प्रियाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्य भूमिका साकारलेल्या प्रियाला बॅकग्राऊंड सीन करण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला आहे.
2019 मध्ये ‘ओरु अदार लव’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या प्रियाचा डोळा मारतानाचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला होता. या एका व्हिडीओमुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर तिला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळाला. परंतु आता सिद्धार्थ-जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात ती बॅकग्राऊंड एक्स्ट्रा म्हणून दिसून आली. या सीनमध्ये तिच्यासाठी कोणताच डायलॉग नव्हता. त्यामुळे असा सीन करण्याची वेळ तिच्यावर का आली, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. तिने होकारच का दिला, असंही अनेकजण म्हणत आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रिया लाल आणि पांढऱ्या साडीमध्ये दिसून येत आहे. यामध्ये ती लोकांच्या गर्दीच चुपचाप चालताना दिसत आहे. त्यानंतर समोर सिद्धार्थ आणि मनजोत येतात. तेव्हासुद्धा प्रिया लाजत पुढे चालत जाते. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम, एक्स, फेसबुक आणि रेडिटवर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘मला आश्चर्य वाटतंय की आतापर्यंत ही गोष्ट कोणाच्याच लक्षात कशी आली नाही’, असा सवाल एकाने केला. तर ‘प्रियावर इतकी वाईट वेळ आलीये का, की तिला असा रोल करावा लागतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
कोण आहे प्रिया वारियर?
‘ओरु अदार लव्ह’ हा प्रियाच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातील एका गाण्यात तिचा डोळा मारतानाचा सीन होता. तो सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि प्रिया रातोरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं. 2023 मध्ये ‘यारियाँ 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
