Param Sundari : ‘परम सुंदरी’ची बॉक्स ऑफिसवर धमाल; अवघ्या 2 दिवसांतच ‘या’ चित्रपटांना टाकलं मागे
जान्हवी आणि सिद्धार्थ यांच्या 'परम सुंदरी'ने अवघ्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘परम सुंदरी’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 29 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार जलोटाने केलंय. तर ‘छावा’, ‘स्त्री 2’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘मॅडॉक फिल्म्स’च्या दिनेश विजनने याची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर ‘परम सुंदरी’ला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याची जबरदस्त कमाई सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7.25 कोटी रुपये कमावले आहेत. यासह हा सिद्धार्थच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलं.
बॉक्स ऑफिस ट्रॅकस ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी नऊ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांची कमाई जवळपास 16.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ‘परम सुंदरी’ हा जान्हवीच्याही करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने तिच्या आधीच्या ‘उलझ’ आणि ‘मिली’ यांना मागे टाकलं आहे. ‘उलझ’चा लाइफटाइम कलेक्शन 9.07 कोटी रुपये, तर ‘मिली’चा 2.82 कोटी रुपये होता.
‘परम सुंदरी’च्या पुढे ‘रुही’ (21.93 कोटी रुपये), ‘मिस्टर अँड मिसेस माही’ (36.34 कोटी रुपये), ‘देवारा- पार्ट वन’ (62.12 कोटी रुपये) आणि ‘धडक’ (74.19 कोटी रुपये) हे चित्रपट आहेत. जान्हवी आणि सिद्धार्थच्या या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांच्या ‘मेरे हसबंड की बीवी’ या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनलाही (12.85) मागे टाकलं आहे.
‘परम सुंदरी’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्यासोबतच संजय कपूर, मनजोत सिंह, इनायत वर्मा यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात दिल्लीत राहणारा परम सचदेव (सिद्धार्थ मल्होत्रा) त्याच्या वडिलांची मदत मागतो. मदतीऐवजी त्याचे वडील (संजय कपूर) त्याला एक चॅलेंज देतात. तोच चॅलेंज पूर्ण करण्यासाठी परम त्याच्या जग्गी या मित्रासोबत (मनजोत सिंह) केरळला जातो. तिथे त्याची भेट सुंदरीशी (जान्हवी कपूर) होते. त्यानंतर अशा अनेक घडामोडी घडतात, ज्यामध्ये परम आणि सुंदरी अडकतात. या दोघांची ही अनोखी लव्हस्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
