जान्हवीच्या कपड्यांवरून वाद तरी चित्रपटाच्या कमाईचा मोठा रेकॉर्ड; जगभरातील बॉक्स ऑफिसवर डंका
रामचरणच्या 'पेद्दी' या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या चौदा दिवसांत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील जान्हवीच्या कपड्यांवरून आणि सीन्सवरून मोठा वाद झाला होता.

साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पेद्दी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन बुधवारी 14 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईची गती जराशीही कमी झालेली नाही. दररोज हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अवघ्या 12 दिवसांत कमाईच्या 300 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणाऱ्या या चित्रपटाच्या चौदाव्या दिवसाच्या कलेक्शनचेही आकडे समोर आले आहेत. रामचरण आणि जान्हवी कपूरच्या ‘पेद्दी’ने प्रदर्शनाच्या 14 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील जान्हवीच्या सीन्स आणि कपड्यांवरून मोठा वाद झाला होता. तरीसुद्धा प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई करत ‘पेद्दी’ हा चित्रपट रामचरणच्या करिअरमधील सर्वांत मोठा ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट ठरला होता. तर प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापर्यंत कमाईचा आकडा 165 कोटी रुपयांवर पोहोचला होता. तेराव्या दिवशी जगभरात या चित्रपटाने जवळपास 15 कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय केला. आता निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘पेद्दी’च्या चौदाव्या दिवसाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत. या स्पोर्ट्स ड्रामाने 14 दिवसांत कमाईचा 400 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
रामचरण आणि जान्हवी कपूरच्या ‘पेद्दी’ने जगभरात चौदाव्या दिवशी जवळपास 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या परदेशातील कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, आतापर्यंत 52.45 कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. तर भारतात ‘पेद्दी’ने गेल्या 14 दिवसांत एकूण 226 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाने तेलुगू भाषेतच तब्बल 200 कोटी रुपये कमावले आहेत. हिंदी भाषेत मात्र या चित्रपटाची तेवढी जादू चालली नाही. ‘पेद्दी’ने हिंदीत केवळ 21.57 कोटी रुपयेच कमावले आहेत.
‘पेद्दी’ या चित्रपटातील जान्हवी कपूरच्या सीन्सवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाला जान्हवीला फक्त अंगप्रदर्शनापुरतं वापरल्याची टीका प्रेक्षकांनी आणि काही सेलिब्रिटींनीही केली होती. या वादादरम्यान जान्हवीचे काही खासगी चॅट्ससुद्धा लीक झाले होते. त्यावरून तिनेही चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना विरोध केल्याचा खुलासा झाला होता. इतकंच नव्हे तर चुकीच्या कॅमेरा अँगलवरून रामचरणनेही दिग्दर्शकांना फटकारलं होतं. दिग्दर्शक बुची बाबू सनावर बरेच आरोप होत असताना त्यांनी जाहीर माफीनामा सादर केला होता.
