रजनीकांत यांच्या ‘कुली’ला मोठा झटका; कोट्यवधी रुपयांवर फेरावं लागणार पाणी
'कुली' या चित्रपटात रजनीकांत, नागार्जुन, सौबिन शाहिर, उपेंद्र, श्रुती हासन, सत्यराज आणि आमिर खान यांच्या भूमिका आहेत. तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी त्याची कमाई 50 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘कुली’ चित्रपट नुकताच जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. परंतु प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. थिएटरमध्ये ‘कुली’ प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या काही तासांतच तो ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचे हाय-क्वालिटीचे आणि कमी रिझॉल्युशनचे कॉपी टोरंट वेबसाइट्सवर लीक करण्यात आले आहेत. त्याचसोबत ते मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे कॉपीज विविध बेकायदेशीर ऑनलाइन साइट्सवर अपलोड झाले आहेत. इतकंच नव्हे तर टेलिग्राम ग्रुप्समध्येही त्याचे लिंक्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘कुली’च्या कमाईला खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
चित्रपटांची पायरसी हा मुद्दा अनेकदा प्रकर्षाने मांडण्यात आला. इतकंच नव्हे तर वारंवार पायरसीच्या बेकायदेशीर वेबसाइट्सवर कारवाई करण्यात आली. परंतु तरीही अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत. तमिलरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्स आणि मूव्हीजदा यांसारख्या पायरसी पोर्टल्सवर ‘कुली’ हा चित्रपट अपलोड करण्यात आला आहे. या वेबसाइट्सवर 1080p HD ते 240p पर्यंत प्रत्येक व्हर्जनमध्ये चित्रपटाची कॉपी उपलब्ध आहे. विविध टेलिग्राम चॅनल्सवर हा चित्रपट मोफत पाहता येतोय.
जर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या पायरसी साइट्सवरून ‘कुली’ किंवा अन्य कुठलाही चित्रपट डाऊनलोड करून पाहण्याचा विचार करत असाल तर भारतात हा बेकायदेशीर आणि दंडनीय गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. कॉपीराइट्सच्या हक्कांअंतर्गत, पायरसीप्रकरणी 2 लाख रुपये दंड ते तुरुंगवासपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
‘कुली’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम मोडले आहेत. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ब्लॉकबस्टर ठरेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तवला जात होता. परंतु पायरसीमुळे या चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायरेटेड साइट्सवरून अनेकजण मोबाइलमध्ये या चित्रपटाची कॉपी डाऊनलोड करून पाहण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे अशा पायरसीविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. तमिलरॉकर्स, मूव्हीझिलासारख्या वेबसाइट्सवर अशा पद्धतीने एखादा नवीन चित्रपट लीक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट ऑनलाइन लीक झाले आहेत.
