लादेनचा फोटो दाखवत रणवीरचा रोखठोक सवाल, म्हणाला “भारताकडे अशा लोकांची यादी..”
"आम्ही दहशतवादाला सडेतोड उत्तर देतोय आणि पाकिस्तान दहशतवाद पसरवतोय. आम्ही आमच्या नागरिकांना वाचवतोय, आम्ही माणुसकीला वाचवतोय. पाकिस्तान ही दहशतवादाची राजधानी बनली आहे", असं रणवीरने या शोमध्ये म्हटलंय.

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने नुकतीच पीअर्स मॉर्गनच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान सुरु असलेल्या संघर्षावर आणि शस्त्रसंधीबद्दल चर्चा करण्यात आली. सोशल मीडियावर ‘बीअर बायसेप्स’ या युजरनेमने प्रसिद्ध असलेल्या रणवीरने या शोमध्ये “पुरावे, तथ्य आणि आकडे” मांडणार असल्याचं स्पष्ट करत ओसामा बिन लादेनचा फोटो दाखवला. “जगाला ही गोष्ट माहीत असायला हवी. हा चेहरा अख्खं जग ओळखतं”, असं म्हणत त्याने 26/11 चा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनचा फोटो शोमध्ये दाखवला. त्यानंतर त्याने लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अब्दुल रौफच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैनिक उपस्थित असल्याचा दुसरा फोटो सर्वांसमोर दाखवला. “या चेहऱ्याला भारत ओळखतं”, असं त्याने म्हटलं.
पाकिस्तानकडून सतत खोटी माहिती पसरवली जात असताना रणवीरने या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी त्याच्यासोबत पॅनलमध्ये भारतीय पत्रकार बरखा दत्त, पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना खार आणि ‘द पाकिस्तान एक्सपिरीअन्स’चे शहजाद घियास शेख उपस्थित होते. यावेळी रणवीर म्हणाला, “हा माणूस संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी आहे आणि पाकिस्तानी सैन्य त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहतं. या गोष्टी पाकिस्तानी लोकांकडून सांगितल्या जात नाहीत. अमेरिकेला यातलं काही माहीत नाही.”
“THIS is the narrative the world should know.”
Ranveer Allahbadia holds up a picture of Osama Bin Laden during Piers Morgan’s debate on the ceasefire with Pakistan.
Watch in full 👇
📺 https://t.co/Qdt5aeDU8q@piersmorgan | @BeerBicepsGuy | @BDUTT pic.twitter.com/9l0XVWZkHy
— Piers Morgan Uncensored (@PiersUncensored) May 12, 2025
या चर्चेत रणवीरने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्यदलांची कारवाई कशाप्रकारे मोजून मापून आणि अचूक होती, हेदेखील सांगितलं. “भारताचे हल्ले अचूक, मध्यम स्वरुपाचे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते नेहमीच बदला घेण्यासाठी होते. भारत कधीच आक्रमक नव्हता. आम्ही जगाला लस, तत्त्वज्ञान, अभियंते आणि नेते निर्यात करतो. म्हणूनच आमची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अकरा पट जास्त आहे. जगाला फक्त ओसामा बिन लादेन माहीत आहे, पण भारताकडे अशा लोकांची यादीच आहे. पिअर्स, मी तुला प्रश्न विचारतो. तू तथ्य आणि पुरावे पाहिलेस. तुला या परिस्थितीबद्दल काय वाटतं”, असा थेट सवाल त्याने अँकरला केला.
या शोमध्ये रणवीरला त्याच्या डिलिट केलेल्या पोस्टबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. या पोस्टमध्ये रणवीरने पाकिस्तानी लोकांचा उल्लेख बंधु-भगिनी असा केला होता आणि मी त्यांचा द्वेष करत नाही असं म्हटलं होतं. तू तुझी पोस्ट का डिलिट केली, असा सवाल मॉर्गनने विचारला असता रणवीर म्हणाला, “कारण पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्या देशावर पुन्हा विश्वास न ठेवण्याचं कारण त्यांनी दिलं. जरी तुम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तरी ते म्हणतील की पहलगाम हल्ल्याचे पुरावे कुठे आहेत? माझा त्यांना हा सवाल आहे की हे जग तुमच्याबद्दल काय म्हणतंय ते तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलंत का?”