सुसल्या बदलली, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्री साकारणार भूमिका

अभिनेत्री पौर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले'च्या तिसऱ्या पर्वात सुसल्याची भूमिका साकारणार आहे. (Ratris Khel Chale Purniemaa Dey Suslya )

सुसल्या बदलली, 'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्री साकारणार भूमिका
ऋतुजा धर्माधिकारीने रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या पर्वात सुसल्याची भूमिका साकारली होती

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ या झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेचे तिसरे पर्व सुरु झाले. पहिल्याच भागात अण्णा नाईक यांनी दर्शन दिले. त्यानंतर मोलकरणीच्या भूमिकेतील माई, वेडा माधव अशी एक-एका जुन्या पात्राची पुन्हा गाठ पडत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात भेटलेली सुसल्याही परत आली आहे. मात्र आता ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीच्या वाट्याला आली आहे. (Ratris Khel Chale 3 Actress Purniemaa Dey to play role of Shevanta Anna Naik Daughter Suslya Sushma)

ऋतुजा धर्माधिकारीने सुसल्या गाजवली

‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात नवोदित अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारीने साकारलेली सुसल्याची भूमिका भाव खाऊन गेली होती. सुसल्याच्या भूमिकेतील नखरा तिने अचूक पकडला होता. सुसल्याचं खरं नाव सुषमा. शेवंता आणि अण्णा नाईक यांची ती मुलगी. ऋतुजाने भूमिकेत जान ओतली होती. याच मालिकेच्या जोरावर ऋतुजाला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही मजल मारता आली.

‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या पर्वात शेवंता केवळ उल्लेखापुरती होती. दुसऱ्या पर्वात मात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका गाजवली. त्यावेळी सुसल्याचं लहानपणीचं रुप पाहायला मिळालं. तिसऱ्या पर्वात आता अण्णा नाईकांच्या मृत्यूनंतरचं कथानक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सुसल्या परत आली आहे.

अभिनेत्री पौर्णिमा डे ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या पर्वात सुसल्याची भूमिका साकारणार आहे. पौर्णिमाने तुला पाहते रे मालिकेत ईशाच्या जावेची नकारात्मक भूमिका साकारली होती. पुन्हा तिच्या वाटेला खलनायिका आली आहे. याआधी अग्गंबाई सासूबाई मालिकेतही तिचं दर्शन घडलं होतं. तर सिंगिंग स्टार या गायक अभिनेत्यांच्या रिअॅलिटी शोमध्येही तिचा गाता गळा रसिकांना अनुभवता आला होता.

पौर्णिमा डेसमोर सुसल्याचा नखरा पेलण्याचं आव्हान आहे. तिसऱ्या भागात सुसल्याचं दर्शन घडलं, तेव्हा गावातील एका साध्याभोळ्या इसमाला ती आपल्या जाळ्यात ओढताना दिसली. सुसल्याचं लग्नही झालं आहे. तिचा नवरा सयाजीराव हा निलंबित पोलीस दाखवला आहे. भोळ्या भाबड्या माणसांना भुलवून, धमकावून त्यांच्याकडे पैसे-दागिने लुटण्याचा सुसल्या आणि सयाजीचा डाव दिसत आहे. (Ratris Khel Chale Purniemaa Dey Suslya )

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नाईकांचा वाडा घशात घालण्याचं मिशन आता सुसल्याकडे दिसत आहे. अभिरामची खोटी सही मिळवता येईल, पण माईचा अंगठा कसा घ्यायचा, याची शक्कल ते दोघं लढवत असतात. माईचा अंगठा जबरदस्ती वाड्याच्या कागदपत्रांवर घेत असताना, त्याचवेळी अभिरामचं झालेलं पुनरागमन स्टोरीला ट्विस्ट देणार आहे. त्यामुळे पुढील काही भागात काय घडणार, याची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

माई झाल्या मोलकरीण, तर माधव वेडा भिकारी! नाईकांच्या घराची अवस्था पाहून प्रेक्षकही हळहळले

‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अपूर्वाने फोटो शेअर करत दिले संकेत!

(Ratris Khel Chale 3 Actress Purniemaa Dey to play role of Shevanta Anna Naik Daughter Suslya Sushma)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI