मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. कधीच भरत नाहीत; रवीना टंडनची मुलाखत चर्चेत
अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. रवीनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री रवीना टंडन तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. विविध मुलाखतींमध्ये तिने अनेकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली बेधडक मतं मांडली आहेत. तिच्या अशाच एका मुलाखतीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रवीनाला तिच्या गाड्यांच्या आवडीविषयी प्रश्न विचारण्यात आला असता तिने मुंबईच्या रस्त्यांवरील अवस्थेवरून थेट मंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. ‘रस्त्यांचा कर कोणाच्या खिशात जाते, मला माहीत नाही. पण मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे हे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे आहेत.. जे कधीच भरत नाही’, असा टोला तिने लगावला आहे. रवीनाची ही मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“तुला गाड्यांची खूप आवड आहे, मग तुझ्याकडे कोणकोणत्या गाड्या आहेत,” असा प्रश्न रवीनाला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे एक स्पोर्ट्स कार होती. परंतु बॉम्बेचं (मुंबई) ट्रॅफिक आणि इथले रस्ते पाहता मी लोकांना सल्ला देईन की, महागडी आणि चांगली गाडी खरेदी करू नका. रोड टॅक्स कुठे जातो, कोणाच्या खिशात जातो, ते मला माहीत नाही. आजच्या घडीला बॉम्बेमध्ये चांगली गाडी ठेवणं खूप कठीण आहे. ट्रॅफिक इतकं आहे, प्रदूषण इतकं आहे आणि खड्डे जरा जास्तच मोठे आहेत, मंत्र्यांच्या खिशांएवढे… कधीच भरत नाहीत.”
View this post on Instagram
“बॉम्बेमध्ये तुम्ही गाडीचा वेग 40 पेक्षा वर करूच शकत नाही. एकतर इथे रस्त्यावर लोकांची घरं असतील आणि ते पाहून तुम्हालाच प्रश्न पडेल की मी मोहल्ल्यातून जातेय की एकेकाळी इथे रस्ता होता? रस्त्यावरील खड्डे इतके मोठे आहेत, असं वाटतं आपण चंद्रावरच पोहोचलोय. मुंबईच्या रस्त्यांवरच कालवे आहेत आणि मान्सून काळात तर इथे बोटिंगच केली जाते. मला आठवतंय की मी राकेश श्रेष्ठा यांच्या फोटोशूटसाठी गेली होती आणि त्याठिकाणी पूर्ण साचलं होतं. अखेर त्यांनी त्यांची बोट बाहेर काढली आणि त्या बोटीवर आम्ही फोटोशूट केलं होतं. ही 1994 ची गोष्ट आहे. त्यामुळे गाड्यांचा शौकच संपला. आता फास्ट आणि चांगली गाडी घेण्याचं मन होत नाही,” अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली आहे.
रवीनाने या जुन्या मुलाखतीत जे म्हटलं, ते आजही लागू होतं, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. आजही परिस्थिती काहीच बदललेली नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे.
