आई होण्यासाठी रिया चक्रवर्तीने उचललं मोठं पाऊल
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आई होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. यासंदर्भात तिने तिच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. लग्न आणि मूल जन्माला घालण्याबद्दल महिलांवर किती दबाव असतो, याविषयीही ती व्यक्त झाली.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने गेल्या काही वर्षांत तिच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रियावर अनेक आरोप झाले आणि तिला तुरुंगवासही भोगावा लागला. सीबीआयने रियाला क्लिन चीट दिल्यानंतर तिने आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आई होण्याविषयी, मातृत्वाच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. इतकंच नव्हे तर आई होण्यासाठी रियाने मोठं पाऊल उचललं आहे. याविषयीचाही खुलासा तिने या मुलाखतीत केला. आई होण्यासाठी रियाने नुकतीच एका गायनोकॉलोजिस्टची भेट घेतली आणि एग फ्रिजिंगचा निर्णय घेतला आहे.
“मी आता 33 वर्षांची आहे आणि नुकतीच मी एका गायनोकॉलोजिस्टकडे गेली होती. मला एग फ्रिजिंग करायचं आहे. त्यासाठी मी तिचा सल्ला घेतला. हे सर्व खूपच विचित्र असतं. कारण महिलांच्या शरीराचं एक घड्याळ असतं आणि त्यानुसार या वयात वाटतं की आपल्यालाही मूल-बाळ असावं. पण मग डोकं तुम्हाला म्हणतं की तुम्ही स्वत: अजूनही लहानांसारखे वागता. मातृत्वाची जबाबदारी खूप मोठी असते. तुम्हाला तुमचा ब्रँड, बिझनेस आणि बाळालाही सांभावं लागतं”, असं रिया म्हणाली.
रिया चक्रवर्तीचं वय 33 वर्षे असून अद्याप तिचं लग्न झालं नाही. त्यामुळे तिला आई होण्याबाबतची चिंता सतावत आहे. रियाने सांगितलं की ती तिच्या बायोलॉजिकल क्लॉकसोबत करिअरचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करतेय. याआधी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत रियाने म्हटलं होतं, “महिलांनी लग्न करावं आणि मुलांना जन्म द्यावा, अशीच समाजाची अपेक्षा असते. परंतु लग्नाचं ठराविक वय असतं, यावर माझा विश्वास नाही. मला उशिराने लग्न करण्यातही कोणतीच समस्या नाही. बायोलॉजिकल क्लॉकमुळे महिलांवर प्रेग्नंसीचा फार दबाव असतो.” फक्त रियाच नव्हे तर याआधी अनेक सेलिब्रिटींनी एग्ज फ्रीज केले होते. अभिनेत्री प्रियांका चोप्राने वयाच्या तिशीतच एग्ज फ्रीज केले होते.
एग फ्रिजिंग म्हणजे काय?
एग फ्रीजिंग ही एक अशी प्रक्रिया आहे जी महिलांची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. एग फ्रीजिंगमुळे गर्भधारणेचं योग्य वय उलटून गेल्यानंतरही महिलांना गर्भधारणेची सुविधा मिळते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, डॉक्टर महिलेची संपूर्ण तपासणी करतात. एका महिलेच्या शरीरात दर महिन्याला एक अंड तयार होतं. पण प्रत्येक महिन्यात तयार होणारं अंड हे फ्रीज करण्यायोग्य किंवा गोठवण्यास योग्य नसल्यामुळे कोणत्या महिन्याची अंडी जपून ठेवायची हे तपासण्यांनंतर कळतं.
जर अंड्याचे जतन करण्याचं प्रमाण कमी असेल तर नंतर त्या अंड्यातून गर्भधारणा होण्याची शक्यताही कमी असते. म्हणूनच अंडी काढण्यापूर्वी महिलांवर उपचारही केले जाऊ शकतात. जेव्हा अंडी पूर्णपणे निरोगी असतात आणि गर्भधारणा करण्यास सक्षम असता, तेव्हा डॉक्टर अत्यंत काळजीपूर्वक अंडी काढून टाकतात. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असून त्यामुळे छोटी शस्त्रक्रिया करता येते. या अंतर्गत, अतिशय पातळ सुईने अंडी काढली जाते आणि ती सबझिरो तापमानात गोठवली अथवा फ्रीज केली जातात.
