कोणासोबत डेटवर गेली रिंकू राजगुरू? केला रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा
'सैराट' फेम रिंकू राजगुरू कोणासोबत डेटवर गेली होती, या प्रश्नाचं उत्तर अखेर तिने दिलं आहे. त्याचसोबत तिने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचाही खुलासा केला आहे. 'आस्क मी एनिथिंग' सेशनदरम्यान तिने चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत.

नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली. या चित्रपटात तिने साकारलेली आर्ची आजही लोकप्रिय आहे. ‘सैराट’नंतर रिंकूने इतरही काही चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असणारी रिंकू सतत तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच तिने ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनदरम्यान चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी रिंकूने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचाही खुलासा केला. रिंकू खऱ्या आयुष्यात ‘सिंगल’ आहे की कोणाला डेट करतेय, हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच उत्सुकतेपोटी एका युजरने तिला हा प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे रिंकू कोणासोबत डेटवर गेली होती, या प्रश्नाचंही उत्तर नेटकऱ्यांना मिळालं आहे.
‘रिंकू तुझा आज सोशल मीडियावर विषय चालू आहे ते खरं आहे का? रिंकू डेटवर गेली म्हणून..’, असं एका युजरने विचारलं. त्यावर रिंकूने डेटचा फोटो शेअर करत त्यावर लिहिलं, ‘सोलो डेट’. म्हणजेच रिंकू इतर कोणासोबत नाही तर स्वत:ला वेळ देण्यासाठी ‘सोलो डेट’वर गेली होती. त्यानंतर दुसऱ्या युजरने तिला विचारलं, ‘तुझा प्रेमावर विश्वास आहे का?’ त्यावर रिंकूने उत्तर दिलं, ‘होय’. आणखी एका नेटकऱ्याने रिंकूला ‘तू सिंगल आहेस का’ असा सवाल केला. त्यावरही तिने ‘होय’ असं उत्तर लिहिलंय.

या सेशनदरम्यान रिंकूने तिच्याविषयीच्या इतरही काही प्रश्नांची उत्तरं दिली. ‘आमच्या सुपरस्टारबद्दल आम्हाला माहीत नसलेली एखादी गोष्ट सांग’, असं एकाने विचारलं असता त्यावर तिने लिहिलं, ‘मी खूप संवेदनशील आणि भावनिक आहे.’ यावेळी रिंकूने तिचं खरं नावसुद्धा सांगितलं आहे. ‘खरं नाव प्रेरणा आणि टोपणनाव रिंकू’ असल्याचं तिने स्पष्ट केलं.

रिंकूच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच ‘बेटर हाफ ची लव्हस्टोरी’ यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 22 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. रिंकूच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.
