संजय दत्तची जबरा फॅन, निधनापूर्वी अभिनेत्याच्या नावावर केली 72 कोटींची संपत्ती; त्या पैशांचं पुढे काय झालं?
अभिनेता संजय दत्तच्या नावावर एका चाहतीने तिची संपूर्ण संपत्ती केली होती. निधनापूर्वी तिने 72 कोटी रुपयांची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती. त्या संपत्तीचं पुढे काय झालं, याचा खुलासा संजू बाबाने केला आहे.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. कधी कोणी त्या सेलिब्रिटीच्या नावाचा टॅटू काढतो, तर कधी त्यांच्या घरी महागड्या भेटवस्तू पाठवल्या जातात. परंतु एका जबरा फॅनने तर तिची 72 कोटींची संपत्ती आवडत्या अभिनेत्याच्या नावावर केली आहे. या अभिनेत्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत त्याने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्याच्या प्रेमापोटी चाहतीने तिची संपूर्ण संपत्ती त्याच्या नावावर केली. 2018 मध्ये एका चाहतीने तिच्या निधनापूर्वी 72 कोटींची संपत्ती अभिनेता संजय दत्तच्या नावावर केली होती. या वृत्ताने सर्वांनाच चकीत केलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर खुद्द संजय दत्तने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या प्रॉपर्टीचं पुढे काय झालं, याचाही खुलासा संजू बाबाने केला.
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तला 2018 मधील त्या वृत्ताच्या सत्यतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “खरंच एका चाहतीने तिच्या निधनापूर्वी कोट्यवधींची संपत्ती तुमच्या नावावर केली होती”, असा सवाल संजयला विचारला गेला. त्यावर तो म्हणाला, “होय, हे खरं आहे. माझ्या एका चाहतीने तिची 72 कोटींची संपत्ती माझ्या नावावर केली होती. परंतु मी ती स्वीकारली नव्हती. मी त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या कुटुंबीयांकडे परत सोपवली होती.”
View this post on Instagram
2018 मध्ये असं वृत्त समोर आलं होतं की 62 वर्षांच्या निशा पाटील नावाच्या एका चाहतीने त्यांची 72 कोटी रुपयांची संपूर्ण संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तची ही चाहती मुंबईत राहत होती आणि त्यांना गंभीर आजार झाला होता. त्यांनी बँकेला सांगितलं होतं की, माझ्या निधनानंतर माझी सगळी संपत्ती संजय दत्तकडे सोपवा. परंतु संजू बाबाने ती संपत्ती स्वीकारली नसल्याचं स्पष्ट केलंय.
संजय दत्तने आतापर्यंत जवळपास 160 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याने हिंदीसह तेलुगू, कन्नड, तमिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलंय. संजयने चौकटीबाहेरच्या भूमिका स्वीकारल्या असून नायक आणि खलनायक अशा त्याच्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालंय.
