लग्नाच्या 24 वर्षांनंतर खान कुटुंबातील सदस्याचा घटस्फोट; सलमानबद्दल पूर्व वहिनी स्पष्टच म्हणाली..
सीमा सजदेहने 1998 मध्ये सलमान खानचा छोटा भाऊ सोहैल खानशी लग्न केलं होतं. 2022 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमा तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

नेटफ्लिक्सच्या ‘द फॅब्युलस लाइव्स’ या शोमधून प्रकाशझोतात आलेल्या सीमा सजदेहचा सलमान खानच्या कुटुंबीयांसोबत खूप खास नातं आहे. सीमाने 1998 मध्ये सलमानचा छोटा भाऊ आणि अभिनेता सोहैल खानशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या 24 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. सोहैलशी घटस्फोट घेतल्यानंतरही सीमाचं खान कुटुंबीयांसोबतचं नातं कायम आहे. विभक्त झाल्यानंतर त्यांच्यात कटुता निर्माण झाली नाही. सोहैल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. वेळेनुसार बदललेले प्राधान्य आणि परस्पर मतभेद यातून त्यांच्यात वाद होऊ लागले आणि त्यामुळेच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता सीमाने खुलासा केला की खान कुटुंबीयांनी या काळात तिची खूप साथ दिली होती. तिने पुढे असंही स्पष्ट केलं की हा पाठिंबा फक्त शब्दांपुरताच मर्यादित नव्हता.
सीमा म्हणाली, “माझ्या कुटुंबाने मला अनेक प्रसंगी पाठिंबा दिला. सोहैल आणि माझ्यात भांडणं झाली, तेव्हासुद्धा ते अनेकदा माझ्या बाजूने उभे राहिले. ते अजूनही मुलांच्या संगोपनात माझी मदत करतात. योहान आता किशोरवयीन आहे आणि जर मला त्याच्यासंदर्भात काही मदत हवी असेल तर मी सोहैलच्या बहीण किंवा भावाकडे न डगमगता जाऊ शकते. ते नेहमीच मदतीसाठी हजर असतात. मी जरी घटस्फोटीत असले तरी माझी मुलं अर्धी खान आणि अर्धी सजदेह आहेत, त्यामुळे त्यांच्याद्वारे हे कुटुंब नेहमीच माझं राहील.”
View this post on Instagram
घटस्फोटानंतर सोहैलसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सीमाने कबूल केलं की सुरुवातीचा टप्पा भावनिकदृष्ट्या फार कठीण होता. “असं अनेकदा व्हायचं की मी त्याच्यावर चिडायचे आणि तो माझ्यावर रागवायचा. पण शेवटी, मी माझ्या आयुष्यातील 25 वर्षे त्याच्यासोबत घालवली आहेत. तो नेहमीच माझ्या मुलांचा पिता असेल आणि मी नेहमीच त्यांची आई असेन. हे बंधन आम्हाला आयुष्यभर बांधून ठेवणार आहे”, अशा शब्दांत सीमा व्यक्त झाली.
याविषयी सीमा पुढे म्हणाली, “जेव्हा मी खान कुटुंबात लग्न केलं तेव्हा मला खरोखरंच ‘हम साथ साथ है’च्या सेटवर असल्यासारखं वाटलं होतं. कारण तिथे नेहमीच सर्वजण एकत्र असतात. तिथे मला कधीच परकेपणाची भावना जाणवली नाही. मी काही दिवसांपूर्वीच सोहैलच्या आईला भेटले आणि मी त्यांना अजूनही माझी सासू म्हणते. त्यांनीही माझी विचारपूस केली आणि म्हणाले, तू का येत नाहीस? खूप दिवस झाले, कृपया इथे येत राहा.”
घटस्फोटानंतर सीमा सजदेहवर बरीच टीकासुद्धा झाली होती. तिला ‘गोल्ड डिगर’ असंही म्हटलं गेलं. या ट्रोलिंगबद्दल सीमा म्हणाली, “बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला खूप खंबीर असावं लागतं. जेव्हा लोक मला गोल्ड डिगर म्हणायचे तेव्हा मला सर्वाधिक दु:ख व्हायचं. लोक मला ट्रोल करायचे आणि म्हणायचे की मी सर्व पैसे घेऊन निघून गेली. ते खूप वेदनादायी होतं.”
