100 रुपये भाडं, वेटर आणि बांगड्या विकून काढले दिवस, 7वी नापास असणारा हा अभिनेता आज 2700 कोटींचा मालक
सातवी नापास, 100 रुपये भाडे असणाऱ्या रुममध्ये राहून काढले दिवस. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या बॉलिवूडमधील या सुपरस्टारची आज संपत्ती 2700 कोटी रुपये.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार आज उद्योगातील सर्वाधिक मेहनती आणि शिस्तप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. वर्षभरात अनेक चित्रपट पूर्ण करणारा अक्षय आज कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. मात्र, या यशामागे प्रचंड संघर्ष, कठोर परिश्रम आणि अनेक अडचणींचा सामना दडलेला आहे. स्वतः अक्षय कुमारने अनेक मुलाखतींमध्ये आपल्या आयुष्यातील या कठीण दिवसांची आठवण सांगितली आहे.
एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की, ‘जेव्हा मी चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात केली, तेव्हा माझ्या खिशात 200 रुपयेही नव्हते. आज देवाच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे.’ त्याच्या या विधानातून त्याने केलेल्या संघर्षाची कल्पना येते.
अक्षय कुमारचे बालपणही अनेक अडचणींनी भरलेले होते. तो सातवीमध्ये नापास झाला होता. त्याच काळात त्याच्या वडिलांना कर्करोगाचे निदान झाले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याने विविध छोटी-मोठी कामे केली. बँकॉकमध्ये त्याने वेटर म्हणून काम केले, पासपोर्ट कार्यालयात नोकरी केली, बांगड्या विकल्या, तसेच एका फॅशन फोटोग्राफरचा सहाय्यक म्हणूनही काम केले. अभिनय क्षेत्रात आल्यानंतरही त्याचा संघर्ष संपला नाही. सुपरस्टार होण्यापूर्वी त्याच्या सलग 14 चित्रपटांना अपयश आले होते.
ANI ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने आपल्या बालपणाच्या आठवणी सांगताना म्हटले की, त्याचे कुटुंब मूळचे दिल्लीतील चांदणी चौक परिसरातील आहे. त्या घरात तब्बल 24 जण एकाच घरात राहत होते. सर्वजण एका खोलीत झोपायचे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडताना एकमेकांवरून उड्या मारत बाहेर जावे लागायचे, अशी आठवण त्याने सांगितली.
परिस्थिती बिकट असून चेहऱ्यावर आनंद
यानंतर त्याचे कुटुंब मुंबईत आले आणि सायन-कोळीवाडा परिसरात अवघ्या 100 रुपये मासिक भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहू लागले. त्या काळातील आठवणींना उजाळा देताना अक्षय म्हणाला, ‘देवाची शपथ, असा एकही दिवस नव्हता की आम्ही हसलो नाही. त्या वेळी आमच्याकडे पैसे नव्हते, पण आनंद भरपूर होता. आज सर्व काही असूनही कधी-कधी उदास वाटते.’
आज अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे 2,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही तो आपल्या संघर्षाच्या दिवसांना विसरलेला नाही. त्याचा हा प्रवास मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही व्यक्ती मोठे यश मिळवू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण मानला जातो.
