‘रक्त खवळतं, मी हात जोडून …’ ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षेंनी शेअर केला व्हिडीओ
'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका व्हिडीओद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये हात जोडून प्रेक्षकांना एक विनंती केली आहे. नक्की त्यांनी या व्हिडीओमधून काय सांगितलं ते पाहुयात.

सध्या सगळीकडे विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचीच चर्चा आहे. चित्रपटाच्या रिलीजनंतर सर्व थिएटर हाऊसफुल आहेत. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.चित्रपटातील डायलॉग आणि सीन्स अंगावर शहारे आणतात. चाहत्यांकडून विकीचं, त्याने केलेल्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचणारा ठरतोय. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे.
चित्रपट पाहून शरद पोंक्षेंनी व्हिडीओद्वारे आपलं मत मांडलं
सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनी देखील हा चित्रपट पाहून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच आता मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील ‘छावा’ चित्रपट पाहिला आहे. दरम्यान त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर एका व्हिडीओद्वारे त्यांची प्रतिक्रियाही दिली आहे.
‘छावा’ चित्रपट त्यांना एवढा भावला आहे की त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचं आणि चित्रपटाच्या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हात जोडून एक विनंती देखील केली आहे. नक्की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हटलं आहे ते पाहुया.
“प्रत्येक हिंदूने पाहायला हवा असा चित्रपट”
व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले की, “मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट खूपच उत्तम बनवला आहे. प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहायला हवा. चित्रपट पाहाताना रक्त खवळतं आणि डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.” असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहिला”
पुढे ते म्हणाले की, “आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट शूट केला आहे, की त्यांचं कौतुक करायला हवं. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात जेवढे मराठी कलाकार आहेत, सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आपापलं काम केलं आहे. खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.एआर रहमान यांचे बॅकग्राउंड म्युझिक खूप छान आहे.” असं म्हणतं त्यांनी चित्रपटाची जमेची बाजूही सांगितली.
View this post on Instagram
“मी हात जोडून विनंती करतो….”
पुढे त्यांनी चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याबद्दल बोलले आहेत. “औरंगजेब शेवटी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांची एवढ्या क्रूरतेने हत्या करतो, ते पाहवत नाही. कुठे असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारखे महानायक महाराष्ट्रात जन्मले आणि कुठे आजकालचे तरुण. हा चित्रपट पाहावा लागेल, महानायकांकडून शिकावं लागेल. प्रत्येक तरुण, प्रत्येक भारतीय, प्रत्येक हिंदूने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो ‘छावा’ नावाचा चित्रपट आहे तो पाहायला हवा. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज आताच तिकीट काढा आणि छावा पाहा,”
असं आवाहन शरद पोंक्षे यांनी केलं आहे. तसेच चित्रपटाचा शेवट पाहवत नाही असं म्हणत त्यांनी त्याबद्दलची भावना आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं प्रेम, आदर व्यक्त केला आहे.