तो चित्रपट पुन्हा पाहिला तर लाजेखातर मरेन..; अभिनेत्रीकडून पश्चात्ताप व्यक्त
या अभिनेत्रीने कमी वयातच वयस्कर भूमिका साकारल्या आहेत. एका चित्रपटात तिने तिच्यापेक्षा वयाने फक्त 5 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारली होती. वयाच्या 28 व्या वर्षीच तिने अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार असतात, जे निवडक भूमिका साकारतात, पण त्यातूनही आपल्या दमदार अभिनयकौशल्याची विशेष छाप सोडतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अशाच एका अभिनेत्रीने आजवर तिच्या करिअरमध्ये अत्यंत लक्षपूर्वक भूमिकांची निवड केली. यामुळे तिच्या चित्रपटांची संख्या इतरांच्या तुलनेनं कमी राहिली, परंतु तिच्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर समीक्षकांकडूनही तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. या अभिनेत्रीनं तिच्या दशकभराहून अधिक करिअरमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. ज्या अभिनेत्रीविषयी आम्ही बोलतोय, ती दुसरी तिसरी कोणी नसून शेफाली शाह आहे. ‘दिल्ली क्राइम 3’मधील वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शेफालीने अत्यंत कमी वयातच वयस्कर भूमिका साकारण्यास सुरुवात केली होती. 2005 मध्ये तिने ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’मध्ये अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. आश्चर्याची बाब म्हणजे खऱ्या आयुष्यात शेफाली अक्षयपेक्षा वयाने फक्त पाच वर्षांनी मोठी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूतकाळातील अशा भूमिका आठवून शेफाली हसली आणि थोडा संकोचलेपणाही व्यक्त केला. “आज जर मी तो चित्रपट पाहिला तर लाजेखातर मरून जाईन.” या चित्रपटात शेफालीने सुमित्रा ठाकूरची भूमिका साकारली होती, जी अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या ईश्वरचंद ठाकूर यांच्या पत्नीची भूमिका असते. त्यावेळी शेफाली फक्त 28 वर्षांची होती.
View this post on Instagram
अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘वक्त’ या चित्रपटानंतर शेफालीने निर्णय घेतला की ती पुन्हा कधीच अशा अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारणार नाही, जो तिच्यापेक्षा वयाने मोठा किंवा फक्त काही वर्षांनी लहान असेल. शेफालीने असंही सांगितलं की 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटासाठी दिग्दर्शिका झोया अख्तरने दिलेली भूमिकाही नाकारणार होती. परंतु जेव्हा तिने एक सीन वाचला की “वह मूंह में केक ठूस लेती है”, तेव्हा लगेच तिने निलम मेहराच्या भूमिकेला होकार दिला.
