मी महाराष्ट्राची मुलगी आहे….भाषा वादावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात सध्या हिंदी आणि मराठी भाषांवरून वाद सुरू आहे. यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत. याचबद्दल आता शिल्पा शेट्टी आणि संजय दत्त यांनी देखील मत मांडलं आहे. केडी: द डेव्हिल या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी यावर प्रतक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या हिंदी आणि मराठी भाषांवरून वाद सुरू आहे. यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी मुंबईत केडी: द डेव्हिल या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. हा मूळ कन्नड चित्रपट असला तरी, यात बॉलिवूडचे अभिनेते संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांचा आकर्षक लूक
‘केडी: द डेव्हिल’ मधील संजय दत्त यांचा नवा अवतार पाहून चाहते थक्क झाले असून, ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर शिल्पा शेट्टी यांच्या अभिनयाने चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत. चित्रपटाविषयी बोलताना शिल्पा आणि संजय यांनी इतर अनेक मुद्द्यांवरही आपली मतं व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महाराष्ट्रातील भाषा वादावर आपलं मत मांडलं.
शिल्पा शेट्टीचं भाषा वादावरील मत
पत्रकाराने शिल्पा आणि संजय यांना विचारलं, “जन्मभूमी आणि कर्मभूमी यांच्या भाषा शिकण्याचं सध्याचं महत्त्व काय? नवीन भाषा शिकणं चांगलं आहे, पण त्याची सक्ती करणं योग्य आहे का?” यावर शिल्पा म्हणाली, “या प्रश्नाचं उत्तर संजू देईल” यावर सर्वजण हसले.
चित्रपट मराठीतही डब करू शकतो
संजय यांनी यावर उत्तर देताना विचारलं, “तुम्ही काय म्हणालात, ते नीट समजलं नाही. कृपया समजावून सांगा. ” यावर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने सांगितलं की, आता सगळं काही ‘पॅन इंडिया’ झालं आहे. याला उत्तर देताना शिल्पा म्हणाली, ‘मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि मला मराठी येते. आम्ही आज केडीबद्दल बोलायला आलो आहोत. कोणताही वाद वाढवायचा नाही. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे, आणि आम्ही तो मराठीतही डब करू शकतो.”
या चित्रपटात ध्रुव सर्जा, संजय दत्त, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद आणि व्ही. रविचंद्रन मुख्य भूमिकेत आहेत. हा पॅन इंडिया चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
