शाहरुख नव्हे तर हा अभिनेता बनणार होता मोहन भार्गव.. ‘स्वदेस’चा हा किस्सा माहित्ये ?
प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या एका गाजलेल्या चित्रपटात शाहरुख खानऐवजी आधी दुसराच अभिनेता काम करणार होता. मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. एवढंच नव्हे तर या चित्रपटातील भूमिकेसाठी हृतिक रोशन आणि आर.माधवन हे दोघंही रेसमध्ये होते. अखेर हा चित्रपट शाहरुखलाच मिळाला, बॉक्स ऑफीसवर तो फारसा चालला नसला तरी तो चित्रपट नंतर कल्ट ठरला. कोणता होता तो अभिनेता ?

2004 साली प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेस’ (Swades) हा चित्रपट रिलीज झाला. त्यामध्ये शाहरुख खानने (Shah Rukh Khan) मोहन भार्गवचं पात्र साकारलं. हा त्याचा आत्तापर्यंतच सर्वांत उत्तम परफॉर्मन्स मानला जातो. हा एक असा चित्रपट आहे, जो बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला असला तरी प्रेक्षकांना तो मनातून खूप आवडला आणि जसजसा काळ गेला तसं या चित्रपटाल कल्टचा दर्जा मिळाला. मात्र बहुतांश लोकांना हे माहीत नसेल की या चित्रपटासाठी अभिनेता शाहरुख खान याला पहिली पसंती नव्हती.
आमिर खानच्या ‘लगान’ मध्ये बाघाची भूमिका साकारणारा आणि ‘स्वदेस’ चा सह-लेखक अमीन हाजी याच्या सांगण्यानुसार, सुरूवातीला हा चित्रपट आमिर खानला (Aamir Khan) ध्यानात ठेवून लिहीला गेला होता. पहिले या चित्रपटाचं नाव ‘देस’ असं ठेवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर आमिर खान व्यतिरिक्त अभिनेता हृतिक रोशनलाही याची कहाणी ऐकवण्यात आली होती. तसेच अभिनेता आर.माधवन यानेही या रोलसाठी ऑडिशन दिली होती.
आमिरलाच होती पहिली पसंती
अमीन हाजी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, ‘लगान’च्या यशानंतर आशुतोष गोवारीकर यांच्या पुढील चित्रपटात ‘देस’ (जो नंतर ‘स्वदेस’ या नावाने प्रदर्शित झाला) आमिर खानच मुख्य भूमिकेत दिसणार होता. एवढंच नव्हे, तर आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मितीही आमिरच करणार होता. सुरुवातीपासूनच या प्रोजेक्टवर आमिरसोबत काम सुरू होतं आणि ‘लगान’नंतर गोवारीकर आणि आमिरची जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार, हे जवळपास निश्चित झालं होतं.
असा आला कथेत ट्विस्ट
मात्र कथेत ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा आमिर खानला स्क्रिप्टमधील काही भाग आवडला नाही. चित्रपटाची मूळ संकल्पना आणि कथानक त्याला खूप आवडलं; पण ज्या पद्धतीने स्क्रिप्ट तयार करण्यात आली होती, त्याबाबत आमिर पूर्णपणे समाधानी नव्हता. स्क्रीनप्लेवर पुन्हा काम करावं अशी आमिरची इच्छा होती. मात्र समस्या केवळ कथेशी संबंधित नव्हती, तर वेळेचीही होती. त्या काळात आमिर आपल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होता आणि गोवारीकरांना स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यासाठी आवश्यक वेळ देऊ शकत नव्हता.
मात्र दुसरीकडे, ‘लगान’ नंतर आशुतोष गोवारीकरला जास्त वेळ न घालवता त्याच्या पुढल्या चित्रपटाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करायची होती. त्यामुळे आमिर आणि आशुतोष यांनी परस्पर संमतीने या चित्रपटात एकत्र पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा चित्रपट अखेर शाहरुख खानच्या वाट्याला आला.
आपल्यामुळे या प्रोजेक्टला उशीर होत असल्याचे जेव्हा आमिरच्या लक्षात आल्यावर त्याने मनाचा मोठेपणा दाखवत प्रोजेक्टमधून माघार घेतली. तुला आवडणारा अभिनेता तू निवडा. मी या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तयार आहे, असंही आमिरने सांगितलं. मात्र नंतर तो या चित्रपटाच्या निर्मितीतूनही बाजूला झाल्याचं, हाजी यांनी नमूद केलं.
आशुतोष गोवारीकरने इतरांना ऐकवली कथा
यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने इतर कलाकारांशी चर्चा सुरू केली. त्याने ऋतिक रोशनलाही या चित्रपटाची कथा ऐकवली, तर अभिनेता आर. माधवन यानेही या चित्रपटातील मोहन भार्गवच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.
दरम्यान, ‘लगान’च्या ऐतिहासिक यशानंतर शाहरुख खानला हा चित्रपट पाहायचा होता. त्याच्यासाठी फिल्म सिटीमधील एडलॅब्स येथे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं. त्यावेळी अमीन हाजी स्वतः शाहरुखच्या शेजारी बसला होता. चित्रपट पाहतानाच शाहरुख भावूक झाला आणि म्हणाला, “ मला आशुच्या पुढच्या चित्रपटात काम करायलचा हवं. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. मला ‘देस’ हा चित्रपट करायचा आहे आणि मोहन भार्गवची भूमिका मलाच साकारायची आहे” असं शाहरुखने सांगितल्याचं हाजी म्हणाले.
अखेर शाहरुखचीच या चित्रपटातील भूमिकेसाठी निवड झाली आणि त्याने अतिशय उत्कृष्टरित्या मोहन भार्गवची भूमिका साकारली. डिसेंबर 2004 साली रिलीज झालेला ‘स्वदेस’ हा बॉक्स ऑफीसवर फार यशस्वी ठरला नाही. मात्र जसजसा काळ गेला तसतसं या चित्रपटाला कल्ट दर्जा मिळाला आणि तो हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरला. शाहरूखच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असा हा चित्रपट मानला जातो. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त गायत्री जोशी, राजेश विवेक, दयाशंकर पांडे यांच्यासारखे अनेक कलाकार झळकले.
