माझ्या निधनाबद्दल समजलं तरी तू..; ‘बाघा’च्या वडिलांची शेवटची इच्छा, रडत शूटिंग केलं पूर्ण
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाच्या वडिलांचं जून महिन्यात निधन झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तन्मयने त्याच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेविषयी सांगितलं.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाचे वडील अरविंद वेकारिया यांचं जून महिन्यात निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने तन्मय पूर्णपणे खचला होता. सेटवर असतानाच त्याला त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल समजलं होतं. तेव्हा निर्माते असित कुमार मोदी यांनी त्याला शूटिंग सोडून आधी कुटुंबाकडे जाण्यास सांगितलं होतं. तरीही तन्मयने आधी शूटिंग संपवलं आणि त्यानंतर तो वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा हीच असल्याचा खुलासा केला आहे.
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तन्मय वेकारियाने सांगितलं की, त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की, जर त्यांचा मुलगा शूटिंग करत असताना त्याला निधनाची बातमी समजली, तर त्याने शूटिंग अर्धवट सोडू नये. ते पूर्ण करूनच त्याने यावं. वडिलांच्या या शेवटच्या इच्छेनुसारच तन्मयने त्यादिवशी शूटिंग पूर्ण केलं आणि मगच तो मुलगा म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सेटवरून निघाला. जेव्हा तन्मय शूटिंग करत होता, तेव्हा त्याचे वडील अरविंद वेकारिया यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मास्टर शॉट पूर्ण झाल्यावर नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते किरण भट्ट यांनी त्याला रुग्णालयात सोडलं. नंतर किरण संपूर्ण वेळ तन्मयसोबत होते.
तन्मयची पोस्ट-
View this post on Instagram
किरण भट्ट हे तन्मय वेकारियाच्या वडिलांचे जवळचे मित्रही होते. अरविंद वेकारिया हे गुजराती रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक होते. या कठीण काळात ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी तन्मयची खूप साथ दिली होती. याविषयी तो एका मुलाखतीत म्हणाला, “फक्त या दु:खद काळातच नाही तर असित भाई नेहमीच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये माझ्या आईचं निधन झालं होतं, त्यानंतर माझे वडील 24 जून 2026 रोजी मला सोडून गेले. मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलंय. या प्रत्येक परिस्थितीत असित भाईंनी माझी साथ दिली. ते खूप दयाळू आहेत, त्यांची माझी खूप मदत केली आहे. एका खंबीर भावाप्रमाणे ते माझ्या बाजूने उभे राहिले.”
