400 कोटींचा खर्च, 64 टक्क्यांहून अधिक तोटा; सुपरस्टारच्या चित्रपटाने निर्मात्यांना केलं कंगाल
या बिग बजेट चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अत्यंत लज्जास्पद कामगिरी केली आहे. निर्मात्यांनी तब्बल 400 कोटी रुपये खर्चून हा चित्रपट बनवला आहे.

एखादा मोठा सुपरस्टार घेऊन निर्मितीवर प्रचंड पैसा खर्च करून बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेलच असं नाही. कथा हाच चित्रपटाचा गाभा असतो आणि फक्त कथेच्या जोरावर एखादा चित्रपट सुपरहिट ठरू शकतो. हेच गणित मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटाला जुळवता आलं नाही. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘ द राजा साब’ हा आहे. संक्रांतीच्या सुट्ट्यांचा फायदा उचलूनही ‘द राजा साब’ हा सर्वांत मोठा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. प्रभासच्या स्टारडमचा फायदा उचलत या चित्रपटाने सुरुवात तर दमदार केली, परंतु पुढे ही गती टिकवता आली नाही. आता प्रदर्शनाच्या बाराव्या दिवशी या चित्रपटाला अवघे काही लाख रुपयेही कमावणं कठीण झालं आहे. तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा आतापर्यंत 64 टक्क्यांहून अधिक तोटा झाला आहे.
प्रभासच्या ‘द राजा साब’ या चित्रपटाने निर्मात्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची एवढी चर्चा होती की बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताच संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. आधी तर चित्रपट समीक्षकांनी त्यावर नकारात्मक टिप्पणी केली आणि त्यानंतर प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावला नाही. या चित्रपटाच्या कमकुवत कथेवर आणि दिग्दर्शनावर इतकी टीका झाली की पुढे अनेकांचा त्यातील रस कमी झाला. ‘द राजा साब’चं डिस्ट्रीब्युशन तगडं असूनही अनेक शोज रिकामे गेले आहेत. धक्कादायक म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटूनही, बजेटच्या 50 टक्केही वसुली करता आली नाही. तुटपुंज्या कमाईमुळे या चित्रपटाने निर्मात्यांना कंगाल केलं आहे.
‘द राजा साब’ने पहिल्या आठवड्यात 130.25 कोटी रुपये कमावले. त्यानंतर प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी फक्त 3.5 कोटी रुपये, नवव्या दिवशी 3 कोटी रुपये, अकराव्या दिवशी 2.6 कोटी रुपये, बाराव्या दिवशी 8 लाख रुपये आणि तेराव्या दिवशी 5 लाख रुपये कमाई झाली. ‘द राजा साब’ची गेल्या 14 दिवसांत एकूण कमाई जवळपास 142.71 कोटी रुपयांच्या घरात झाली आहे.
‘द राजा साब’ हा तेलुगू हॉरर कॉमेडी चित्रपट 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. परंतु 14 दिवसांत फक्त 142 कोटी रुपयांची कमाई होऊ शकली आहे. त्यामुळे एकंदरीत निर्मात्यांचा 64.48 टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे. टॉलिवूडसाठी हा अलिकडच्या काळातील सर्वांत फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तर प्रभाससाठी ‘बाहुबली’नंतरच्या काळात ‘राधेश्याम’नंतर हा दुसरा मोठा निराशाजनक चित्रपट ठरला आहे.
