‘छावा’ सिनेमा मराठीत प्रदर्शित होणार, मंत्री उदय सामंत यांची पोस्ट व्हायरल
Chhaava: 'छावा' सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांत मोठे विक्रम रचले आहे. आता सिनेमा मराठीत प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. यासाठी मंत्री उदय सामंत यांनी घेतली दिग्दर्शकांची भेट...

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आहे. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते होते. अखेर 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृह हाऊस फुल झाली. सिनेमाच्या कमाई दिवसागणिक वाढ होत असताना. सिनेमा मराठीतून देखील प्रदर्शित व्हावा… अशी मागणी प्रेक्षकांकडून होताना दिसली. आता मंत्री उदय सामंत यांनी दिग्दर्शकांची भेट घेऊन सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होईल असे संकेत दिले आहेत.
मंत्री उदय सामंत यांनी दिग्दर्शत लक्ष्मण उतेकर आणि अमेय खोपकर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी सिनेमा मराठीतून देखील प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे. एक्सवर फोटो पोस्ट करत उदय सामंत म्हणाले, ‘आज “छावा” चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. ” छावा ” चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.सोबत अमेय खोपकर उपस्थित होते…’ सध्या त्यांचं ट्विट व्हायरल होत आहे.




आज “छावा” चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. ” छावा ” चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde… pic.twitter.com/c5aZSyMAjP
— Uday Samant (@samant_uday) February 18, 2025
सांगायचं झालं तर, अभिनेता संतोष जुवेकर याने लाइव्ह सेशल केलं. तेव्हा अभिनेत्याला सुद्धा मराठीत सिनेमा प्रदर्शित होणार का? याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. सिनेमात संतोष याने रायाजी यांच्या भूमिकेला न्याय दिलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने आतापर्यंत 171.28 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने 200 कोटींच्यावर मजल मारली आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘छावा’ सिनेमाचे शो हाऊसफुल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात सिनेमा किती कोटींच्या घरात पोहोचेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमातील कलाकार
‘छावा’ सिनेमात विकी कौशलशिवाय रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम आणि प्रदीप रावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.