ती व्यक्ती चुकीची..; ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपबद्दल विवेक ओबेरॉय स्पष्टच म्हणाला
अभिनेता विवेक ओबेरॉय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेम, ब्रेकअप आणि ब्रेकअपनंतर सहन करावं लागणारं दु:ख यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यासोबतच ब्रेकअपचीही जोरदार चर्चा होती.

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचं रिलेशनशिप जगजाहीर होतं. त्यांच्या लव्हस्टोरीची जेवढी चर्चा होती, त्याहून अधिक त्यांच्या ब्रेकअपची होती. ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपचा विवेकच्या आयुष्यावर प्रचंड परिणाम झाला होता. आयुष्यात मी कधीच कोणाशी लग्न करणार नाही, असं त्याने ठरवलं होतं. परंतु हळूहळू तो त्या ब्रेकअपच्या दु:खातून सावरला आणि अखेर 2010 मध्ये प्रियांका अल्वाशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्याच्या आयुष्यातील या भावनिक प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “एखादी व्यक्ती तुमच्यासाठी चुकीची असू शकते, परंतु तिच व्यक्ती दुसऱ्या एखाद्यासाठी योग्यसुद्धा असू शकते. कदाचित तुम्ही जेव्हा भेटता, तेव्हा वेळ चुकीची असेल”, असं तो म्हणाला.
याविषयी विवेक पुढे म्हणाला, “जी व्यक्ती तुमच्यासाठी चुकीची असू शकते, ती दुसऱ्यासाठी कदाचित चांगली असू शकते. फरक फक्त वेळेचा असतो. कदाचित तुमची भेटण्याची वेळ चुकीची असू शकते. अशा लव्हस्टोरीज तुम्ही पाहिल्या असतील. काही काळासाठी मी एकटाच राहू लागलो होतो. मला रिलेशनशिप नको होतं. परंतु जेव्हा तुम्हाला ती योग्य व्यक्ती भेटते, तेव्हा तुमच्यासोबत घडलेल्या सर्व वाईट गोष्टी एखाद्या वाईट स्वप्नासारख्या वाटू लागतात. काही गोष्टींबद्दल आपल्याला वाटतं की ती खूप मोठी समस्या आहे. परंतु आपण अशा गोष्टींचा ताण घेऊ नये. कारण नंतर त्याच गोष्टींवरून आपण हसतो.”
“कमी वयात जेव्हा तुमचा ब्रेकअप होतो, तेव्हा तुम्हाला वाटतं की हे जगच संपलंय. ती मला सोडून गेली, आता मी काय करणार, असं तुम्हाला वाटतं. मग दोन वर्षांनंतर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला डेट करू लागता. त्या व्यक्तीसोबत तुम्ही खुश राहता आणि लग्नसुद्दा करता. तुमची मुलंबाळं होतात आणि आयुष्य अशा पद्धतीने पुढे चालत राहतं. तरुण असताना प्रेमात पडणं खूप सोपं असतं. परंतु जसं तुम्ही मोठे होते, तसं नात्यात चुका करू लागता. त्या चुकांमधून तुम्ही शिकता. तेव्हा तुम्हाला समजतं की हा प्रवास फक्त प्रेम करण्याचा नव्हता. ही तर सुरुवात होती. प्रेम करत राहणं एक वेगळं आव्हान असतं”, अशा शब्दांत विवेकने त्याचा अनुभव सांगितला.
