नाटकाविषयी गिरीजा ओकने प्रश्न विचारताच फडणवीसांचं भन्नाट उत्तर; एकच पिकला हशा!
अभिनेत्री गिरीजा ओकने पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली असून यामध्ये तिने त्यांच्या आवडत्या नाटक किंवा चित्रपटाविषयीही प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी दिलेलं भन्नाट उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकने नुकतीच पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गिरीजाने त्यांना विविध मुद्द्यांवर प्रश्ने विचारली. त्यापैकीच एक प्रश्न अर्थातच चित्रपट आणि नाटकांबद्दलचा होता. “तुम्ही नाटक किंवा चित्रपट बघता का? त्यासाठी वेळ मिळतो का? किंवा तुम्हाला आवडलेला नाटक किंवा चित्रपट कोणता”, असा सवाल गिरीजाने केला. त्यावर “अलीकडच्या काळात फारशी नाटकं पाहणं होत नाही”, असं फडणवीस म्हणाले. तेव्हा गिरीजा त्यांना मस्करीत म्हणते, “नाही, नाटकं बघताय तुम्ही, फक्त ती आम्ही केलेली नाहीत.” त्यावर फडणवीस हसून म्हणतात, “नाटकं बघतोय आणि करतोयही.. आता काय सांगू?” हे ऐकून गिरीजासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.
“मी पूर्वी फार नाटकं बघायचो. मी फार सीरिअस माणूस नाही, मला हलकं-फुलकंच आवडतं. त्यामुळे ‘सही रे सही’ हे नाटक खूप आवडलं होतं. अजूनही मला ते नाटक पाहायची इच्छा होते. लहान असताना मी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक पाहिलं होतं. तेव्हा माझं ते नाटक समजण्याचं वयही नव्हतं. पण ते नाटक मला इतकं आवडलं की तेव्हापासून मी मराठी नाटकं पहायला लागलो. त्यानंतर मी बरीच नाटकं बघितली आणि आता राजकारणात मला इतकी लोकं भेटतात, त्यांना विचारलं की, तुम्ही असं का केलंत? तर ते म्हणतात ‘तो मी नव्हेच'”, असं फडणवीस पुढे सांगतात.
‘सही रे सही’ हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी विनोदी नाटक आहे. यामध्ये भरत जाधवची मुख्य भूमिका असून या नाटकाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या नाटकाचे हिंदी आणि गुजराती भाषांमध्येही प्रयोग झाले आहेत. तर ‘तो मी नव्हेच’ हे आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक आहे. प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेमुळे हे नाटक गाजलं.
या मुलाखतीत फडणवीसांनी आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. एखादा चित्रपट त्यांना आवडला नाही तर ‘फक्त मीच का ते सहन करू’ असं म्हणत ते इतरही दोन-चार मित्रांसमोर मुद्दाम त्याचं कौतुक करायचे. इतकंच नव्हे तर त्या चित्रपटाचं तिकिट ते स्वत: खरेदी करून द्यायचे. नंतर जेव्हा तो मित्र चित्रपट पाहून यायचा, तेव्हा मग आम्ही दोघं मिळून इतरांसमोर त्या चित्रपटाचं कौतुक करायचो. असं त्यांनी दोन-तीन चित्रपटांबद्दल केल्याचं सांगताच सर्वांनाच हसू अनावर झालं.
