तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी नाही तर केसांसाठीही वरदान, जाणून घ्या कसे वापरावे
तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की हेच तांदळाचे पाणी देखील तुमच्या केसांना अनेक फायदे देतात. यामुळे केस गळण्यासारख्या समस्या लवकर बरे होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया त्याचा वापर कसा करायचा.

बदलती जीवनशैली, अनियमित आहार, ताणतणाव, प्रदूषण अशा कारणांमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. केसगळती रोखण्यासाठी अनेकजण बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु कधीकधी महागड्या हेअर केअर प्रॉडक्ट्समुळेही ही समस्या पूर्णपणे दूर होत नाही. त्याने आणखीन केसांची समस्या वाढत जाते.
त्यानंतर अनेकजण महागड्या उत्पादनांच्या वापरानंतर घरगुती उपाय करण्यास सुरुवात करतात. यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या केसांच्या आरोग्यसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करा. कारण हे पाणी केसांवर अधिक लाभदायक उपचार मानले जाते.
विशेषत: रात्रभर ठेवलेले तांदळाचे पाण्याचा वापर करावा. कारण यात किण्वन प्रक्रियेमुळे अनेक पोषक तत्वे वाढतात, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते. याचा योग्य वापर केल्याने केसगळती थांबते तसेच केसांची वाढ ही वेगवान होते. आज या लेखात आपण तांदळाचे पाणी केसांसाठी कसे फायदेशीर आहे आणि ते वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊयात.
तांदळाचे पाणी केसगळती कशी रोखू शकतात?
रात्रभर ठेवलेल्या तांदळाच्या पाण्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यात आढळणारे इनोसिटॉल नावाचे घटक केसांच्या मुळांना बळकटी देते आणि केसांचे नुकसान कमी करते. याव्यतिरिक्त, आंबवलेल्या तांदळाच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड स्कॅल्पचे आरोग्य सुधारतात आणि केसांना सखोल पोषण देतात.
तांदळाचे पाणी वापरण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम १/२ कप तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. मग या तांदळात २-३ कप पाणी घालून रात्रभर असेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून पाणी वेगळ्या भांड्यात साठवून ठेवावे. तांदळाचे तयार केलेले पाणी बंद डब्यात २४ तास ठेवावे जेणेकरून ते आंबते. केसांवर आंबवलेले पाणी वापरल्याने अधिक परिणामकारक परिणाम मिळतात.
तांदळाचे पाणी केसांना कसे लावावे?
सर्वप्रथम सौम्य शॅम्पूने केस धुवा. यानंतर तांदळाचे पाणी टाळू आणि केसांवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा जेणेकरून पाणी केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल. 20-30 मिनिटे केसांवर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
केसांना तांदळाचे पाणी लावण्याचे फायदे
केसगळती कमी करते: तांदळाच्या पाण्यात असलेले इनोसिटॉल नावाचे तत्व केसांच्या मुळांना मजबूत करते आणि काही दिवसांतच केस गळण्याची समस्या कमी करते.
केसांची वाढ वाढते: तांदळाच्या पाण्यात असलेले अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन्स केसांना पोषण देतात, ज्यामुळे केस वेगाने वाढतात आणि दाट होतात. ते केसांची दुरुस्ती देखील करतात आणि प्रदूषण होणाऱ्या नुकसानापासून त्यांचे संरक्षण करतात.
कोंडा कमी करते: तांदळाच्या पाण्यात अँटीफंगल गुणधर्म असतात, जे टाळू स्वच्छ ठेवतात आणि कोंडासारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. तसेच तांदळाचे पाणी केसांना नैसर्गिक चमक देतात आणि केस मऊ आणि रेशमी बनवतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
