World AIDS Day 2022: HIV आणि एड्सबद्दल च्या गैरसमजांवर नका ठेऊ आंधळेपणाने विश्वास, जाणून घ्या सत्य !

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Dec 01, 2022 | 10:22 AM

दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात 34 वर्षापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने एका कॅम्पेनच्या स्वरूपात केली होती. या आजाराबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, त्याबद्दल सत्य जाणून घेऊया.

World AIDS Day 2022: HIV आणि एड्सबद्दल च्या गैरसमजांवर नका ठेऊ आंधळेपणाने विश्वास, जाणून घ्या सत्य !

नवी दिल्ली – दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. एचआयव्ही (HIV) आणि एड्स (AIDS) याचे नाव ऐकताच बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे एचआयव्ही आणि एड्सबद्दल लोकांना पुरेशी आणि योग्य माहितीच नाही. लोकांना हे दोन्ही सेमच वाटतात. पण खरंतर एचआयव्ही हा व्हायरस आहे तर एड्स हा एक आजार आहे. एचआयव्ही हा असा व्हायरस आहे ज्यामुळे एड्स नामक आजार होऊ शकतो. मात्र एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही झाला असेल तर त्याला एड्स होईलच, असे काही नाही. या आजाराबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज (myths) आहेत, ज्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवतात.

जगभरात एड्सच्या रुग्णांना तर अतिशय चुकीची वागणूक दिली जाते, काही ठिकाणी तर लोक ते (रुग्ण) अस्पृश्य असल्यासारखे वागतात. मात्र अशा परिस्थितीचा सामना करणे हे एड्सच्या रुग्णांसाठी अतिशय वेदनादायक असते. आज, (1 डिसेंबर) जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने अशा काही मिथकांबद्दल /गैरसमजांबद्दल आणि सत्य नेमके काय आहे याबद्दल जाणून घेऊया.

गैरसमज : HIV एचआयव्ही स्पर्शाने पसरतो

सत्य : हा भ्रम दूर करण्यासाठी सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीद्वारे HIV हा स्पृश्य-अस्पृश्यतेचा आजार नाही, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हात मिळवणे अथवा हस्तांदोलन करणे, मिठी मारणे, थुंकणे, घाम येणे किंवा लघवी करणे, याद्वारे हा बिलकूल पसरत नाही. एवढंच नव्हे तर या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णासोबत एकाच भांड्यातलं अन्न खाल्ल्यानेही कोणालाही एचआयव्ही होणार नाही. याचा सर्वात जास्त धोका संक्रमित व्यक्तीच्या रक्तापासून असतो.

गैरसमज : गे आणि लेस्बियन लोकांना एड्स होतो.

सत्य : हे पूर्णपणे चुकीचं आहे. एड्स हा कोणालाही होऊ शकतो, त्याचा लैंगिकतेशी काहीही संबंध नाही. असुरक्षित लैंगिक संबंध अथवा संक्रमित सुया इत्यादींद्वारे हा पसरू शकतो.

गैरसमज : टॅटू किंवा पिअर्सिंग केल्याने HIV/AIDS होऊ शकतो

सत्य : टॅटू अथवा पिअर्सिंग करणाऱ्या कलाकाराने एचआयव्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीची सुई दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरली तरंच असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही टॅटू काढण्यासाठी गेलात तर हे लक्षात ठेवावे की टॅटू आर्टिस्ट दरवेळेस नवी सुई वापरत आहे की नाही. तो तसे करत नसल्यास त्याला रोखावे.

गैरसमज : किस केल्याने होतो एड्स

सत्य : HIV पॉझिटिव्ह व्यक्तीच्या लाळेमध्ये हा व्हायरस अतिशय कमी प्रमाणात असतो, त्यामुळ किस केल्याने दुसऱ्या व्यक्तीला एचआयव्ही अथवा एड्स होत नाही.

गैरसमज : HIV म्हणजेच एड्स होय

सत्य : HIV हा एक असा संसर्ग आहे ज्यामुळे एड्स होतो, परंतु प्रत्येक एचआयव्ही रुग्णाला एड्स होईलच, असे नाही. एड्स हा अर्थातच घातक आहे, पण एचआयव्हीचे रुग्ण सामान्य माणसांप्रमाणेच आपले जीवन जगू शकतात. त्यावर योग्य उपचार करून एचआयव्ही संसर्ग टाळता येतो.

हे सुद्धा वाचा

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI