India-US Tariff Tension : ‘हे ब्राह्मण…’ टॅरिफ संघर्षात ट्रम्प यांचा सल्लागार नको ते जातीवाचक बोलू लागलाय
भारतावर टॅरिफ लावून पुतिन यांच्या वॉर मशीनला मिळणारी आर्थिक मदत रोखली आहे, असं 29 ऑगस्ट रोजी ट्रम्प यांचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो म्हणाले. नवारो यांनी 28 ऑगस्ट रोजी रशिया-युक्रेन संघर्षाला मोदींच युद्ध म्हटलं होतं. नवारोंनी आरोप केलेला की, रशियाकडून तेल खरेदी करुन भारत या युद्धाला हवा देत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, त्यामध्ये एका माणसाची भूमिका महत्त्वाची होती, तो म्हणजे पीटर नवारो. या पीटर नवारोच म्हणणं आहे की, भारत अमेरिकेकडून डॉलरमध्ये पैसा कमावतो, तोच पैसा रशियाकडून तेल खरेदीसाठी वापरतो. त्यामुळे रशियाला युक्रेन युद्ध लढण्यासाठी बळ मिळतं, असा पीटर नवारो यांचा तर्क आहे. हा पीटर नवारो अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यापार सल्लागार आहे. या पीटर नवारोने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. “भारत क्रेमलिनसाठी मनी लॉन्ड्रिंगच्या मशीनशिवाय काही नाही. तुम्ही पाहिलं असेल की, ब्राह्मण, भारतीय लोकांच्या खर्चावर नफा कमवत आहेत. आपल्याला हे थांबवावं लागेल” असं पीटर नवारोने म्हटलय. नवारोने आरोप केला की, “भारतीय रिफायनरीज रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करतात, त्याच तेलाच शुद्धीकरण करुन जास्त किंमतीला एक्सपोर्ट करत आहेत”
“युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून जास्त तेल विकत घेत नव्हता. पण आता भारत रशियाच्या युद्ध मशीनला प्रोत्साहन देत आहे. यात युक्रेनचे लोक मरत आहेत. करदाते म्हणून आपण काय करु शकतो? आपल्याला त्यांना अधिक पैसे पाठवावे लागतील” असं पीटर यांनी म्हटलं आहे.
‘पुतिन आणि शी जिनपिंग यांना का भेटतायत?’
भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाच नवारो यांनी समर्थन केलं तसच मॉस्को आणि बीजिंगसोबतच्या नवी दिल्लीच्या संबंधांमुळे जागतिक स्थिरता कमकुवत होईल असा नवारो यांचा दावा आहे. नवारो म्हणाले की, “मोदी एक महान नेते आहेत. भारत जगातील एक मोठी लोकशाही व्यवस्था आहे, मला समजत नाही की, ते पुतिन आणि शी जिनपिंग यांना का भेटतायत?”
आजची भेट महत्वाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी शंघाय सहकार्य संघटन (SCO) परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमध्ये असताना नवारो यांनी हे वक्तव्य केलय. PM मोदी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटले. मोदी यांचा सात वर्षातील हा पहिला चिनी दौरा आहे. पीएम मोदी आज राष्ट्रपती पुतिन यांनाही भेटणार आहेत. अमेरिकेकडून भारत-रशियाच्या व्यापारी संबंधांवर हल्लाबोल सुरु असताना ही भेट होत आहे.
