Sheikh Hasina : शेख हसीना यांच्याकडे सोन्याचा ढिगारा, लॉकरमध्ये सापडले इतके किलो सोने
Sheikh Hasina Gold : काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशातच आता शेख हसीना यांना आणखी एक धक्का बसला आहे. शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोने सापडले आहे.

काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने शेख हसीना यांना मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी ठरवत हा निर्णय दिला होता. अशातच आता शेख हसीना यांना आणखी एक धक्का बसला आहे. शेख हसीना यांचे बँक लॉकर राष्ट्रीय महसूल मंडळाच्या केंद्रीय गुप्तचर युनिटने शोधून काढले आहे. त्यानंतर ढाका येथील पुबाली बँकेच्या मोतीझील शाखेत असलेले लॉकर क्रमांक 128 जप्त करण्यात आले. यात काय सापडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना होती. अशातच आता एनबीआरने हसीना यांच्या दोन बँक खात्यांमधून एकूण 5.6 दशलक्ष टका रक्कन जप्त केली आहे. हसीना यांच्यावरील गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
लॉकर्समधील संपत्ती जप्त
एनबीआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुबाली बँकेच्या मोतीझील शाखेत शेख हसीनाच्या नावाची दोन बँक खाती सापडली आहेत. यापैकी एका खात्यात 1.2 दशलक्ष टका फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (FDR) होती, तर दुसऱ्या खात्यात 4.4 दशलक्ष टका रोख रक्कम आढळली आहे. अधिकाऱ्यांनी ही सर्व रक्कम जप्त केली आहे.
शेख हसिना यांच्या दोन लॉकरमधून 832 तोळे सोन्याचे दागिने जप्त
शेख हसिना यांच्या मालकीच्या दोन लॉकरमधून 832 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 832 तोळे सोने म्हणजे 8 किलो आणि 320 ग्रॅम सोने. हे लॉकर काही काळापूर्वी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता न्यायालयाच्या परवानगीनंतर ते उघडण्यात आले, त्यात हा सोन्याचा ठिगारा सापडला आहे.
अवामी लीगचे सरकार कोसळल्यानंतर तपासाला सुरुवात
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अवामी लीगचे सरकार कोसळले होते. त्यांनंतर अंतरिम सरकारने सत्ता हातात घेत शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबाची करचोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली. हा तपास सुरु असताना NBR ने आता हे गुप्त लॉकर जप्त केले होते. आता अधिकारी इतर बँकांमधील संपत्तीचा शोध घेत आहे. त्यामुळे आगामी काळात शेख हसीना यांची आणखी संपत्ती समोर येण्याची शक्यता आहे.
