भारताच्या नावाने खोटं बोलून चीन मुस्लिम देशांना विकतोय…US काँग्रेसच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
US काँग्रेसच्या रिपोर्टमधून एक धक्कादायक खुलासा झाला. चीन भारताचं नाव वापरुन मुस्लिम देशांशी खोटं बोलत आहे. चीन बिझनेससाठी या सगळ्याचा वापर करुन फायदा आपल्या पदरात पाडून घेत आहे. वास्तवात यात अजिबात तथ्य नाहीय.

भारत-पाकिस्तान यांच्यात मे 2025 मध्ये चार दिवस सैन्य संघर्ष झाला. चीनने या संधीचा पुरेपूर वापर करुन घेतला. US काँग्रेसच्या ताज्या रिपोर्टनुसार बीजिंगने चार दिवसांच्या या युद्धात पाकिस्तानच्या मदतीने आपल्या शस्त्रास्त्रांची टेस्ट करुन घेतली. आता चीन या टेस्ट रिझल्टस बद्दल वाढवून चढवून गोष्टी सांगत आहे आणि याचा वापर मुस्लिम देशांना शस्त्रास्त्र विकण्यासाठी करत आहे. रिपोर्ट्नुसार चीनने युद्धात फक्त आपल्या शस्त्रांची टेस्टिंग केली नाही, तर संपूर्ण जगात तो आता याची जाहीरातबाजी करत आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपला शस्त्रास्त्रांचा बाजार अधिक बळकट व्हावा हा त्यामागे उद्देश आहे.
7 ते 10 मे या चार दिवसांच्या संघर्षात चीनच्या अनेक अत्याधुनिक शस्त्रांचा पहिल्यांदा प्रत्यक्ष युद्धभूमीत वापर झाला. यात HQ-9 एअर डिफेंस सिस्टिम, PL-15 एअर-टू-एअर मिसाइल आणि J-10C फायटर जेट्स होते. चीनच्या आधुनिक शस्त्रांचा पहिल्यांदा युद्धभूमीत वापर झाला. संपूर्ण संघर्षाचा चीनने फिल्ड एक्सपेरिमेंट सारखा वापर केला असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या या दाव्यांमध्ये अतिशयोक्ती
पाकिस्तानने या युद्धात भरपूर मार खाल्ला. पण चीन आणि पाकिस्तान खोट्या प्रचाराद्वारे या शस्त्रास्त्रांची मार्केटिंग करत आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पाकिस्तानी संसदेत दावा केला की, पाकिस्तानच्या J-10C विमानांनी इंडियन एअरफोर्सची विमानं पाडली. य़ात राफेल सुद्धा आहे. पाकिस्तानच्या या दाव्यांमध्ये अतिशयोक्ती असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. चिनी दूतावास याच दाव्यांचा शस्त्रास्त्र विक्रीसाठी वापर करत आहे.
इंडोनेशियाने राफेल खरेदीची प्रक्रिया रोखली
चीनने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट्सच्या माध्यमातून AI द्वारे फोटो आणि व्हिडिओ बनवले व भारतीय विमानांचा ढिगारा म्हणून दाखवलं असं USCC ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. फ्रान्सच्या राफेल फायटर जेट्सची प्रतिमा मलिन करणं आणि J-35 फायटर विमानांच प्रमोशन करण्यासाठी चीनने हे केलं. चीनच्या या अपप्रचारानंतर इंडोनेशियाने राफेल खरेदीची प्रक्रिया रोखली असं रिपोर्टमध्ये फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेने हवाल्याने म्हटलं आहे.
पाकिस्तानने चीनकडून किती टक्के शस्त्र घेतली?
रिपोर्टमध्ये असं सुद्धा आहे की, पाकिस्तान अजूनही चिनी शस्त्रांवर अवलंबून आहे. जून महिन्यात चीनने पाकिस्तानला 40 J-35 फायटर जेट, KJ-500 आणि बॅलेस्टिक मिसाइल डिफेंस सिस्टिम देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटनुसार, मागच्या पाच वर्षात पाकिस्तानने 81 टक्के चिनी शस्त्रास्त्र आयात केली आहेत.
