चीनची अंतराळात मुसंडी, साल 2030 पर्यंत चंद्रावर ठेवणार पाऊल
चीनी ड्रॅगनची अंतराळात घौडदौड सुरु आहे. अमेरिकेने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जवळपास 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता चीन चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी करीत आहे. भारत या क्षेत्रात कुठे आहे. याचा घेतलेला धांडोळा....

बीजिंग: मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्यास 50 हून अधिक वर्षे झालेली आहेत. आता चीन हळूहळू का होईना परंतू ठाम इराद्याने आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याची मोठी तयारी करत आहे. अलिकडेच 30 ऑक्टोबर 2025 रोजी चीनच्या मानव अंतराळ कार्यक्रमाचे प्रवक्त्याने सांगितले की चीन साल 2030 पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याच्या मार्गावर आगेकुच करीत आहे. चीनने गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. असे म्हटले जात आहे चीन वेगाने आपले हे स्वप्न पूर्ण करण्याच्या मोहीमेवर काम करत आहे.
चीनची काय योजना ?
चंद्रावर आतापर्यंत अमेरिकेच्या अंतराळवीरांनी पाऊल टाकले आहे. या घटनेलाही पन्नासहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. चीन आता अमेरिकेच्या मार्गावर वेगाने जात आहे.त्यामुळे अमेरिकेला टेन्शन आले आहे. जर ड्रगन चंद्रावर पोहचला तर अमेरिकेच्या स्पेस पॉवरला मोठा धक्का बसणार आहे.अमेरिकेचे आर्टेमिस III मिशन 2027 मध्ये लाँच होणार आहे. जे 1972 च्या अपोलो – 17 नंतर अमेरिकन अंतराळवीराला पुन्हा चंद्रावर नेणार आहे. परंतू उशीर झाल्यास ही तारीख चीनच्या मानवी मोहिमेच्या अंत्यत जवळ येऊ शकते. चीनने साल 2003 मध्ये आपला पहिला अंतराळवीर यांग लिवेई याला शेनझोऊ-5 मोहिमेद्वारे अंतराळात पाठवले होते. तेव्हापासून आतापर्यंत चीन या दिशेने खूपच पुढे निघाला आहे.
चीनने बांधले स्वत:चे स्पेस स्टेशन
चीनने तियांगोंग नावाचे स्वत:चे स्पेश स्टेशन बनवले आहे. साल 2030 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निवृत्त होईल त्यावेळी जगात केवळ चीनचे परमानंट स्पेस आऊटपोस्ट राहिल. 31 ऑक्टोबर रोजी शेनझोऊ-21 मोहिमेत तीन अंतराळवीरांना तियांगोंग या अंतराळ स्थानकात चीनने पाठवले आहे. हे एप्रिल 2025 पासून तेथे उपस्थित असलेल्या तीन सदस्यांची जागा घेतील. असे क्रु रोटेशन आता चीनसाठी रुटीन बनले आहेत. त्यामुळे यातून चीनची अंतराळातील ताकद दिसून येते. मात्र, परतताना तीन अंतराळ वीरांच्या कॅप्सुलची अंतराळातील कचऱ्याशी टक्कर झाली. त्यामुळे त्यांच्या परतण्याला उशीर लागला. यावरुन कळते ही अशा मोहिमा किती कठीण आणि धोकादायक असतात.
चीनने तयार केले ताकदवान रॉकेट
1970 पासून आतापर्यंत चीनच्या लाँग मार्च रॉकेट्सच्या 20 हून अधिक व्हरायटी तयार झाल्या आहेत. त्यातील 16 अजूनही एक्टीव्ह आहेत. चायना डेली वृत्तपत्रानुसार यांचा यशाची टक्केवारी 97% आहे. जे स्पेसएक्स फाल्कन 9 च्या 99.46% टक्केवारीशी थोडी कमी आहे. या विश्वासार्ह लाँच सिस्टीमच्यामुळे चीनने त्यांच्या मोहिमची टाईमलाईट अचूक राखू शकतो. ऑगस्ट 2025 मध्ये लाँग मार्च -10 ची ग्राऊंड टेस्ट झाली होती. हेच रॉकेट मेंगझोऊ क्रु कॅप्सुलला चंद्रावर घेऊन जाईल.
चीनच्या नव्या अंतराळ यानात काय खास
चीनने मेंगझोऊ आणि लान्युए नावाची 2 नवी अंतराळ यान बनवले आहेत. मेंगझोऊ लवकरच शेनझोऊ याची जागा घेणार आहे. यात दोन भाग आहेत. क्रु मॉड्युल जो अंतराळवीरांसाठी आहे. आणि सर्व्हीस मॉड्युल ज्यात वीज, प्रोपल्शन आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम असते. हे मॉड्युलर डिझाईन आहे. म्हणजे यात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. यात 2 व्हरायटी असतात. ज्यात एक पृथ्वीच्या कक्षेसाठी म्हणजे अंतराळ स्थानक तियांगोंगवरुन येण्याजाण्यासाठी असेल आणि दुसरे डीप स्पेस म्हणजे चंद्र मोहीम वगैरेसाठी असेल. मेंगझोऊ अंतराळ यानात सहा अंतराळवीर बसू शकतात. तर शेनझोऊमध्ये केवळ तीन अंतराळवीरांसाठी जागा असते. याची पहिली अनमॅन्ड चाचणी साल 2026 मध्ये होणार आहे.
मेंगझोऊ सोबत लान्युए लँडर जाणार असून त्याचे नाव माओ यांच्या कवितेवरुन ठेवले आहे. याचा अर्थ ‘चंद्राची गळाभेट घेणे’ ! लान्युएचे दोन भाग आहेत. ज्यात पहिल्या भागात लँडींग स्टेजमध्ये अंतराळवीर राहतील.तर दुसऱ्या भागात प्रोपल्शन स्टेजमध्ये इंधन असणार आहे. हे यान लँडींगच्या आधी वेगळे होणार आहे. लान्युएचे वजन 26 टन असणार आहे आणि दोन अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहेत. याची चाचणी साल 2024 पासून सुरु आहे. 2027-28 मध्ये रोबोटिक प्रोटोटाईप टेस्ट होणार आहे. साल 2028 वा 2029 मध्ये अनमॅन्ड मेंगझोऊ-लान्युए मोहिम होईल तर 2030 रोजी क्रुड मोहिमेची योजना आहे,.
चंद्रावर आधी रोबोट पाठवला आहे
2024 मध्ये चांद्र मोहिमेचा स्पेससुट देखील प्रदर्शित केला होता. चोंगकिंगमध्ये एका टेक्नीशियनने सुट परिधान करुन बसण,झुकणे आणि पायऱ्या चढणे दाखवले होते. चीनने आधीच चंद्रावर रोबोट पाठवला आहे. चांग ई-6 मोहिमेत जून 2024 मध्ये चंद्राच्या पाठच्या भागातून ( फार साईड ) पृथ्वीवर नमूने आणण्यात आले होते. असे करणारा चीन हा पहिला देश होता. साल 2024 मध्ये चीनने अंतराळ मोहिमेत 19 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. जे अमेरिकेने खर्च केलेल्या 79 अब्ज डॉलरहून खूप कमी असले तरी चीनचा या कामात दुसरा क्रमांक आहे. चीनच्या मोहिमा राजकीय बदलामुळे कमी प्रभावित होतात आणि हीच चीनची मजबूती आहे. जर चीन चंद्रावर आधी पोहचला तर नासाचे माजी अधिकारी माईक गोल्ड यांचे म्हणणे सत्य सिद्ध होईल. त्यांनी म्हटले होते जो देश आधी पोहचेल तो चंद्रावर नियम बनवले !
भारताची काय तयारी ?
भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देखील गगनयान मोहीम आखली आहे. या मोहिमेत तीन अंतराळ वीरांना अंतराळात 400 किमी उंचीवर तीन दिवसांसाठी पाठवण्यात येणार असून त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाणार आहे. ही गगनयान मोहिम 2027 च्या पहिल्या तिमाहीत होणे अपेक्षित आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळ मानव पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. मोहिमेच्या आधी तयारीचा भाग म्हणून चाचणी उड्डाणे ( उदा.अनक्रुड आणि रोबोटीक उड्डाणे ) केली जात आहे.
