US Tariff : ही चूक केल्यास 500 टक्के टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा, अमेरिकेच्या निर्णयाने खळबळ
US vs Trump: रशियावरील दबाव वाढवण्यासाठी अनेरिका कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांना याबाबत धमकी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून जगभरातील देशांवर टॅरिफ लादले आहे. अशातच आता रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांना ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिला आहे. रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्धात रशिया माघार घ्यायला तयार नाही, त्यामुळे रशियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका आता मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
500 टक्के कर लादणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा रशिया युक्रेन युद्ध संपवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र ट्रम्प यांना यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आता ट्रम्प यांनी रशियावरील दबाव वाढवताना म्हटले आहे की, रशियाशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला अत्यंत कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागेल. आता ट्रम्प सरकार रशियाला कोंडीत पकडण्यासाठी तयारी करत आहेत. सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकात रशियन तेलाची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून विक्री करणाऱ्या देशावर 500 टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने एकमताने पाठिंबा दिला आहे.
रशिया निर्बंध कायदा
सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि सिनेटर रिचर्ड ब्लूमेन्थल यांनी रशिया निर्बंध कायदा सादर केला आहे. या कायद्याच्या माध्यमातून रशियाला मदत करणाऱ्या देशांवर मोठा कर आणि निर्बंध लादण्यात येणार आहे. पत्रकारांनी ट्रम्प यांना रशिया आणि पुतीन यांच्यावर दबाव आणण्यासाठी उपाययोजना आखण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, ‘यावर काम सुरू आहे, आपण इराणचाही यात समावेश करू शकतो.’
भारतावरील कर कमी होणार
ट्रम्प सरकारने भारतावर 50 टक्के कर लादलेला आहे. यातील 25 टक्के कर हा रशियन तेलाची खरेदी केल्यामुळे लादण्यात आलेला आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. या व्यापार कराराची घोषणा झाल्यास भारतावरील कर कमी होणार आहे. मात्र अद्याप हा कर किती असेल याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
