डोनाल्ड ट्रम्प नरमले, H-1B व्हिसाबाबत घेतला सर्वात मोठा निर्णय, आता 88 लाख फीस….
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवनबी व्हिसासाठी एक लाख डॉलर्स फी घेण्याची घोषणा केली होती. आता याच व्हिसासंदर्भात ट्रम्प यांनी नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

H-1B Visa New Guidelines : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राहिलेले आहे. त्यांनी मूळच्या अमेरिकन लोकांच्या हितासाठी काही निर्णय घेतलेले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे अमेरिकेतील काही लोक स्वागत करत असले तरी भारतासह जगातील काही देशांना मात्र त्यांच्या निर्णयाचा मोठा फटका सहन करावा लागलेला आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एच-वनबी व्हिसाचे शुल्क तब्बल 1 लाख डॉलर्स म्हणजेच 88 लाख रुपयांपर्यंत वाढवले होते. त्यामुळे भारताला या निर्णयाचा मोठा फटका बसला होता. दरम्यान, आता ट्रम्प सरकारने याच एच-वनबी व्हिसासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेत जाऊन नोकरी करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
नेमका काय निर्णय घेण्यात आला?
अमेरिकेच्या सिटिझनशीप अँड इमिग्रशन सर्व्हिस विभागाने H-1B होल्डर्सना मोठा दिलासा दिला आहे. आता ज्या लोकांकडे H-1B व्हिसा आहे आणि त्यांना फक्त व्हिसाचे स्टेटस बदलायचे आहे, त्यांना एक लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. नव्या गाईडलाईन्सनुसार एफ-1 आणि एल-1 व्हिसा असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाचे स्टेटस बदलायचे असेल तर त्यांना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. सोबतच H-1B व्हिसा असलेल्यांना त्यांच्या व्हिसाचे नुतनीकरण करायचे असेल तर वाढीव शुल्क द्यावे लागणार नाही.
अगोदर काय निर्णय घेण्यात आला होता?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 सप्टेंबर रोजी H-1B व्हिसासाठी एक लाख डॉलर्स शुल्क लागू केले होते. या निर्णयानंतर 21 सप्टेंबरपासून H-1B व्हिसासाठी लोकांना एक लाख डॉलर्स फी द्यावी लागत आहे.
कोणा-कोणाला 1 लाख डॉलर्स देण्याची गरज नाही
USCIS विभागाने नुकतेच व्हिसासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार ज्यांच्याकडे अगोदपासूनच एच-1बी व्हिसा आहे, त्यांना फी म्हणून एक लाक डॉलर्स देण्याची गरज नाही. सोबतच एच-1बी व्हिसासाठी ज्यांनी 21 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेला आहे, त्यांनादेखील 1 लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. सोबतच ज्या विद्यार्थ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे एफ-1, एल-1 व्हिसा असेल आणि त्यांना आपला व्हिसा एच-1बी व्हिसामध्ये बदलायचा असेल त्यांनादेखील एक लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीच्या एफ-1 किंवा एल-1 व्हिसाची मुदत संपल्यामुळे संबंधित व्यक्ती अमेरिका सोडून गेलेली असेल आणि त्या व्यक्तीला पुन्हा एच-1बी व्हिसा हवा असेल तर त्या व्यक्तीलादेखील एक लाख डॉलर्स फी देण्याची गरज नाही.
दरम्यान, ट्रम्प सरकारने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे भारतासह जगभरातील लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयाचे भारतासह इतरही देशांकडून स्वागत केले जात आहे.
