Donald Trump : मला नोबेल द्या! पुरस्कार न दिल्यास टॅरिफ लादणार..ट्रम्प यांची अर्थमंत्र्यांनाच थेट धमकी, या बालहट्टाचे करायचे तरी काय?
donald trump on nobel peace prize : इस्त्रायल, पाकिस्तान आणि कंबोडिया सह इतर काही देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे. तर दस्तूरखुद्द ट्रम्प यांनी या शांतता पुरस्कारासाठी कंबर कसली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी उताविळ झाले आहेत. ते शांतता पुरस्कारासाठी इरेला पेटले आहे. भारताने या पुरस्कारासाठी त्यांचे नाव न सुचवल्याने त्यांनी भारतावर टॅरिफ लादल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता हा पुरस्कार पदरात पाडून घेण्यासाठी आता ट्रम्प यांनी नॉर्वे या देशालाच धमकावयाला सुरूवात केली आहे. जगातील सहा हून अधिक युद्ध आपण थांबवली आहे. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कारासाठी आपणच एकमेव पात्र उमेदवार असल्याची घोषणाच त्यांनी केली. आपणच या पुरस्काराचे हकदार असल्याचे त्यांनी जाहीर केले. काय आहे अपडेट?
नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना टॅरिफची धमकी
जगात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार देण्यात येतो.दरम्यान हा शांतता पुरस्कार आपल्याला द्यावा यासाठी ट्रम्प यांनी आता पातळी सोडली आहे. एक महिन्यापूर्वी त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना टॅरिफवर चर्चेसाठी अमेरिकेत बोलावून घेतले आणि नोबेल देण्याची मागणी केली. त्यानंतर आता नार्वेचे प्रसिद्ध वृत्तपत्र डेगेन्स नेरिंगस्लिव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. त्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी नार्वेच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिली. नोबेल पुरस्कार न दिल्यास टॅरिफ लादण्याची धमकी त्यांनी दिली.
इस्त्रायल, पाकिस्तान आणि कंबोडियासह अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे. 6 देशांमध्ये युद्धविराम केल्याने ट्रम्प हेच या पुरस्काराचे मानकरी असल्याचे काही देशांचे म्हणणे आहे. त्यातच ट्रम्प सुद्धा इरेला पेटले आहे. त्यांना हा पुरस्कार कोणत्याही परिस्थितीत पदरात पाडून घ्यायचा आहे.
मी नोबेलचा हक्कदार
नॉर्वेच्या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांनी नॉर्वेचे अर्थमंत्री जेन्स स्टोल्टेनबर्ग यांना फोन केला. त्यावेळी अर्थमंत्री राजधानी ओस्लोच्या रस्त्यांवर पायी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेकजण होते. ट्रम्प यांनी त्यांना टॅरिफची माहिती दिली. त्याचवेळी नोबेल शांतता पुरस्कारसाठी तेच पात्र व्यक्ती असल्याचा दावा केला. नोबेल न दिल्यास टॅरिफ लादण्याची धमकी दिली. आपल्याला शांतता पुरस्कार द्यावा यासाठी ट्रम्प हे नॉर्वेच्या मंत्र्यांच्या मागे लागले आहे. ते वारंवार टॅरिफ आणि अर्थधोरणाआडून पुरस्कार देण्यासाठी दबाव वाढवत असल्याचे नॉर्वेच्या वृत्तपत्राचा दावा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्वेतून आयात होणाऱ्या मालावर 15 टक्के टॅरिफ लावण्याचे जाहीर केले आहे. त्यावर सध्या दोन्ही देशात चर्चा सुरू आहे. जर नोबेलसाठी ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली नाही तर कदाचित नॉर्वेवर सुद्धा टॅरिफ बॉम्ब पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी अमेरिकेच्या 4 राष्ट्राध्यक्षांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. मग तो मला का देण्यात येणार नाही, असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे. स्वीडन हा देश नोबेल पुरस्कार देतो. त्यासाठी एक विशेष समिती आहे. पण ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत हा पुरस्कार हवा आहे. त्यासाठी नॉर्वेने आपले नाव शिफारस करावे अशी त्यांची इच्छा आहे.
