Pakistan Politics : इमरान यांची विकेट काढण्यासाठी मुनीरचा मोठा गेम, यापूर्वी जे कधी पाकिस्तानात ऐकलं नव्हतं, ते घडलं
Pakistan Politics : काहीही करुन इमरान खान यांची विकेट काढायचीच या इरेला आसीम मुनीर पेटला आहे. त्यासाठी त्या देशात खतरनाक षडयंत्र सुरु आहेत. एक मोठा गेम खेळण्यात आला आहे. याआधी जे कधी पाकिस्तान झालं नव्हतं, ते घडलं आहे.

पाकिस्तानात सत्तेवर असताना इमरान खान यांनी फैज हमीदवर सर्वाधिक विश्वास दाखवला. तो तत्कालीन ISI चीफ आहे. आता तो फैज हमीद इमरान खान यांच्याशी दगाबाजी करणार अशी चर्चा आहे. सैन्य न्यायालयाने फैज हमीदला दोषी ठरवलं आहे. तो सरकारी साक्षीदार बनणार अशी चर्चा आहे. 9 मे 2023 च्या प्रकरणात फैज इमरान खान यांच्याविरोधात सरकारी साक्षीदार बनणार आहे. जियो न्यूजशी बोलताना सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाचे खासदार फैसल बावडा यांनी ही माहिती दिली. फैसल यांच्यानुसार लवकरच ही प्रक्रिया सुरु होईल.
पाकिस्तानच्या चकवईमध्ये जन्मलेल्या फैज यांनी वर्ष 1987 मध्ये सैन्यात नोकरी सुरु केली. फैजला सुरुवातीला बलूच रेजिमेंटमध्ये पाठवण्यात आलं. पाकिस्तानी सैन्यामध्ये फैजला असीम मुनीरचं स्पर्धक मानलं जातं. 2019 साली इमरान खान यांनी असीमला हटवून त्यांच्या जागी फैजला नियुक्त केलं होतं. 2015 मध्ये फैजला मेजर जनरल पदावर पदोन्नती मिळाली. फैजला सैन्यात माजी आर्मी चीफ जनरल कमर बाजवाचं निकटवर्तीय मानलं जायचं. बाजवा यांच्यामुळेच फैजला वेळेआधी पदोन्नती मिळालेली. अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार बनल्यानंतर त्यावेळी फैजचा एक फोटो खूप व्हायरल झालेला.
चहाचा कप घेऊन फोटो काढलेला
त्यावेळी फैज काबूल येथे एका हातात चहाचा कप घेऊन फोटो काढताना दिसलेले. या चहाच्या कपाच्या बदल्यात आम्ही 80 हजार लोक गमावले. मागच्या चार वर्षात अफगाणिस्तान समर्थित दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानात 80 हजार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.
फैज सध्या सैन्याच्या ताब्यात
फैजने आपल्या पदाची गोपनीयता ठेवली नाही. त्याशिवाय तो राजकीय प्रकरणात सहभागी होता. फैजच्या इशाऱ्यावरुन खासदारांची कामाची विभागणी करण्यात आलेली. फैजवर 2017 साली नवाज शरीफ यांना सत्तेतून बेदखल करण्याचा आरोप आहे, असं पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने फैज हमीदला 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. फैज सध्या सैन्याच्या ताब्यात आहे. पाकिस्तानी सैन्याला फैजचा सरकारी साक्षीदार म्हणून वापर करायचा आहे.
