‘माझ्या भावाला भाजपशी मैत्री करायची आहे, पण मुनीरला…’ इमरान खानच्या बहिणीच्या विधानाने खळबळ
Imran Khan vs Asim Munir : इमरान खान यांची बहीण अलिमा खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, 'असीम मुनीर हा एक कट्टरपंथी इस्लामी आहे जो भारतासोबत मोठे युद्ध करू इच्छितो.'

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान सध्या जेलमध्ये आहेत. बरेच दिवस त्यांची आणि कुटुंबाची भेट झाली नव्हती, त्यामुळे त्यांची हत्या झाली असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र मंगळवारी त्यांच्या बहिणीने त्यांची भेट घेतली आहे. अशातच आता इमरान खान यांची बहीण अलिमा खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘असीम मुनीर हा एक कट्टरपंथी इस्लामी आहे जो भारतासोबत मोठे युद्ध करू इच्छितो.’
मुनीर हा कट्टरपंथी इस्लामी आहे…
अलीमा यांनी म्हटले की, असीम मुनीर हा एक कट्टरपंथी इस्लामी आहे, त्याचे विचार अत्यंत धार्मिक आहेत. त्यामुळे तो भारतासोबत युद्ध करू इच्छितो आहे. त्याची विचारसरणी कट्टरपंथी असल्याने तो श्रद्धा न मानणाऱ्या लोकांशी लढण्यास प्रेरित होतो.’ पुढे बोलताना अलीमा यांनी म्हटले की, ‘इमरान खान नेहमीच भारताशी संबंध सुधारू इच्छित होते. ते उदारमतवादी आहेत. जेव्हा जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा त्यांनी भारताशी आणि भाजपशीही मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा जेव्हा असीम मुनीरसारखा कट्टरपंथी इस्लामी सत्तेत येतो तेव्हा भारताशी युद्धाची चर्चा वाढते.’ यावेळी अलीमा यांनी पाश्चात्य देशांना इमरान खानच्या सुटकेसाठी पाठिंबा वाढवण्याचे आवाहन केले आहे.
मुनीर सत्तेत आल्यापासून तणाव वाढला
असीम मुनीरच्या मते मुस्लिम हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. तो सत्तेत आल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. एप्रिलमध्ये पहलगाम हल्ला झाला होता, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले होते. याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवरील 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर मुनीरने आक्रमक विधान करत भारताला धमकीही दिली होती.
इमरान खान यांना भीती
मंगळवारी इमरान खान यांच्या बहिणीने त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मोठी भीती व्यक्त केली होती. त्यांच्या पक्षाने इमरान खान यांच्या हवाल्याने मुनीर यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करत म्हटले होते की, ‘असीम मुनीर हा इतिहासातील सर्वात क्रूर हुकूमशहा आहे आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तो माझी हत्या करण्याची योजना आखत आहे. जर तुरुंगात मला काही झाले तर तो त्यासाठी जबाबदार असेल.’
