India-Russia: भारत-रशिया मैत्री तोडण्यासाठी अमेरिकेची खटपट, पुतीन यांच्या उत्तराने ट्रम्प यांचा डाव फसला
भारत आणि रशियाच्या मैत्रीवर रशियाने भाष्य केलं आहे. रशियाने म्हटले की, 'भारतासोबतची मैत्री तोडण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरणार आहेत कारण दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत झाली आहे.'

अमेरिका गेल्या काही दिवसांपासून रशियावर टॅरिफ लावण्याची धमकी देत आहे. भारतासोबत रशियाची असलेली मैत्री तोडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड सुरू आहे. अशातच आता भारत आणि रशियाच्या मैत्रीवर रशियाने भाष्य केलं आहे. रशियाने म्हटले की, ‘भारतासोबतची मैत्री तोडण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरणार आहेत कारण दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत झाली आहे.’ तसेच ट्रम्प यांचा दबान असताना भारताने घेतलेल्या ठोस भूमिकेचेही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने कौतुक केले आहे.
भारत-रशियाची मैत्री तुटणार नाही
आरटी या न्यूज पोर्टलच्या प्रश्नांना उत्तर देताना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ‘दबाव आणि धमक्या असूनही भारत रशियासोबत व्यापार करत आहे. याचे आम्ही स्वागत करतो. भारत आणि रशियामधील संबंध आत्मविश्वासाने आणि परस्पर सहकार्याने सतत पुढे जात आहेत. ही मैत्री तोडण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतील.”
रशियन परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, ‘दोन्ही देशांमधील पार्टनरशीप नागरिकांच्या हिताच्या सर्वोच्च मूल्यावर आणि राष्ट्रीय हितांच्या श्रेष्ठतेवर आधारित आहे. म्हणूनच आमचे संबंध दशकांपासून अतूट आहेत. जागतिक दबावाला न जुमानता दोन्ही देश मोठ्या प्रकल्पांवर एकत्र काम करत आहेत. यामध्ये नागरी आणि लष्करी क्षमता, अंतराळ मोहिमा, अणुऊर्जा आणि इतर अनेक प्रकल्पाचा समावेश आहे.’
अमेरिकेचा भारतावर आरोप
अमेरिका भारतावर रशियन तेलाची खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणत आहे. याच दरम्यान रशियाचे हे विधान केले आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन्ही देशांमध्ये फूट पाडण्याची योजना फसली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी भारतावर आरोप करताना म्हटले होते की, भारत रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी करत आहे, त्यामुळे रशियाला युक्रेनसोबत युद्ध करण्यात फायदा होत आहे. मात्र भारताने हे सर्व आरोप फेटाळले आहे.
भारतावर अतिरिक्त कर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कर लादला होता, मात्र भारताने रशियन तेलाची खरेदी न थांबवल्याने 25 टक्के अतिरिक्त कर लादण्यात आला होता. आता भारतावर 50 टक्के कर आहे. भारताने अमेरिकेचा हा निर्णय अन्यायकारी आणि अविचारी असल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेचा दबाव असताना भारताने तेल खरेदी बंद केली नाही. त्यामुळे भारत आणि रशियातील संबंध आणखी मजबूत झाले आहेत.
