लग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासमध्ये लग्न करुन घरी जाताना नवदाम्पत्याच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांनाही जागीच प्राण गमवावे लागले.

लग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

टेक्सास : लगीनगाठ बांधून घरी निघालेल्या नवदाम्पत्याच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू (Newly Married Couple Death) झाला. अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

19 वर्षांचा हार्ले मॉर्गन आणि 20 वर्षांची रिआन्ना बॉड्रे यांचा विवाहसोहळा शुक्रवारी झाला. टेक्सासमधील ऑरेंज भागात लग्न झाल्यानंतर दोघं गाडीने घरी जाण्यासाठी निघाले. हायवेवर वळताना ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यांचा जागीच मृत्यू ओढावला.

विशेष म्हणजे हार्लेची बहीण आणि आई यांच्या डोळ्यादेखत दोघांच्या कारला अपघात झाला. त्या दोघींनी धावत जाऊन हार्ले आणि रिआन्ना यांना कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो निष्फळ ठरला.

लग्न होऊन काही मिनिटंही होत नाहीत, तोच त्यांना काळाने हिरावून नेल्याचं दुःख त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र मंडळींच्या डोळ्यात दिसत होतं. आपल्या हातावर त्यांच्या रक्ताचे डाग तसेच सुकल्याचंही त्याची आई सांगते.

हार्ले आणि रिआन्ना हे शाळेपासून एकत्र होते. लग्न करुन एकत्र सहजीवनाचा आनंद घेण्याची त्यांची अतीव इच्छा होती. त्यांच्या डोळ्यात खूप स्वप्न होती, मात्र नियतीला ते पाहावलं नाही, अशा शब्दात हार्लेची आई केनिया मॉर्गन यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या मुहूर्तावर भव्य विवाह सोहळा करण्याची दोघांची इच्छा होती. मात्र तोपर्यंत वाट पाहण्याऐवजी त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र मृत्यूनेही त्यांना एकत्रच सोबत नेलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *