Israel Attack : कतारवर हल्ला होताच मोदींनी फोन घुमवला, इस्रायलचं टेन्शन वाढलं; भारताची भूमिका काय?
इस्रायलने कतारच्या दोहा शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारच्या अमीरना कॉल केला आहे. त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली असून इस्रायलच्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Narendra Modi On Qatar Attack : जागतिक पटलावर सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेला अद्याप यश आलेले नाही. तर दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात टोकाचे युद्ध चालू आहे. हमासला समूळ नष्ट करण्यासाठी इस्त्रायलकडून ड्रोन हल्ल्यांसह क्षेपणास्त्र डागले जात आहेत. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असतानाच इस्रायलने कतारवर हल्ला केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी फोन करून चर्चा केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे.
या फोन कॉलची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. इस्रायलने नुकतेच कतार येथील दोहा या भागावर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमीर शेख तमीम यांना फोन कॉल करून या हल्ल्याची निंदा केली आहे. दोहा येथे असलेल्या हमासच्या सदस्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने हा हल्ला केला होता. या हल्ल्याबाबत मोदी यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे.
भारताची भूमिका केली स्पष्ट
विशेष म्हणजे यावेळी मोदी यांनी या हल्ल्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत हा कतारच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करतो, असे त्यांनी कतारच्या अमीर यांना सांगितले आहे. तसेच भारत कुटनीति आणि संवादाच्या माध्यमातून समस्यांवर उपाय शोधण्याच्या मार्गाचे समर्थन करतो. भारत शांतता आणि स्थिरताच्या बाजूने आहे, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच भारत नेहमीच दहशतवादाच्या प्रत्येक स्वरुपाच्या विरोधात असल्याचेही यावेळी मोदी यांनी कतारच्या अमिरना सांगितले.
मोदींच्या ट्विटमध्ये नेमके काय आहे?
कतारच्या अमीर शेख तमीम यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोदी यांनी आपल्या एक्स खात्यावर याबाबत सांगितले आहे. ‘मी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी संवाद साधला. दोहा येथे झालेल्या हल्ल्याबाबत मी चिंता व्यक्त केली. कतारच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करणाऱ्या या घटनेची निंदा करतो. संवाद आणि कुटनीतीच्या माध्यमातून अडचणींवर उपाय शोधण्याचे आम्ही समर्थन करतो. आम्ही शांती आणि स्थिरतेच्या बाजूने आहोत,’ असे सांगितल्याचे मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.
Spoke with Amir of Qatar Sheikh Tamim Bin Hamad Al-Thani and expressed deep concern at the attacks in Doha. India condemns the violation of the sovereignty of the brotherly State of Qatar. We support resolution of issues through dialogue and diplomacy, and avoiding escalation.…
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2025
दोहामध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने 9 सप्टेंबर रोजी दोहा येथील लेकतिफिया जिल्ह्यातील एका शहरावर हवाई हल्ला केला. हमासच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. कतारने हा हल्ला म्हणजे भित्रेपणा असल्याचे म्हटले आहे. तसेच हा हल्ला करून इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनीदेखील या हल्ल्यामुळे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन असल्याचे मत व्यक्त केले आहे.
