रशियाचं नाटो देशांना उघड आव्हान, आणखी एका देशात पुतिन यांनी घुसवले ड्रोन
पोलंडनंतर आता रशियन ड्रोन रोमानियाच्या हवाई क्षेत्रात घुसले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पोलंडप्रमाणेच रोमानिया हा देखील नाटोचा सदस्य आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलंडनंतर आता रशियन ड्रोन रोमानियाच्या हवाई क्षेत्रात घुसले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पोलंडप्रमाणेच रोमानिया हा देखील नाटोचा सदस्य आहे. रशियन ड्रोनने रोमानियाच्या हद्दीत प्रवेश करताच ते ड्रोन पाडण्यासाठी नाटो देशांनी देखील आपल्या विमानांनी या ड्रोनचा पाठलाग केला. याबाबत रोमानियाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की रशियानं युक्रेनवर ड्रोन हल्ला केला, त्याचवेळी रशियाच्या एका ड्रोनने आमच्या सीमावर्ती भागात प्रवेश केला. हे अशावेळी घडलं आहे जेव्हा रशियानं युक्रेनविरोधातील आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाचे 19 ड्रोन पोलंडच्या हवाई क्षेत्रात घुसले होते. त्यानंतर पोलंडने याविरोधात कारवाई करत नाटोचं कलम 4 प्रक्रिया सुरू केली आहे. रशियाकडून सातत्यानं नाटोचे सदस्य असलेल्या देशांच्या हवाई हद्दीत घुसखोरी होत असल्यानं आता नाटो देशांनी देखील या विरोधात मोहीम आखणीला सुरुवात केली आहे. पोलंडमध्ये रशियाचे ड्रोन घुसले, तेव्हाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला होता.
रोमानियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री रशियाचे ड्रोन आमच्या हद्दीमध्ये घुसले होते, त्यानंतर आम्ही आमच्या विमानांनी या ड्रोनचा पाठलाग केला त्यानंतर ते ड्रोन रोमानियाच्या चिलिया गावात असलेल्या रडारजवळून गायब झाले. दरम्यान यापूर्वी देखील रशियाच्या विमानांनी पोलंडच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता, रशियाच्या 19 ड्रोनपैकी चार ड्रोन पाडण्यात आल्याचा दावा पोलंडने केला.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनच्या राजदूताकडून मोठा दावा करण्यात आला आहे, रशियानं पोलंडवर हल्ला केला आहे, ते आता कधीही इंग्लंडवर देखील हल्ला करू शकतात. आम्ही एकटेच आहोत असं नाही तर तुमचा देखील नंबर लागू शकतो, त्यामुळे रशियावर नाटोनं कारवाई करावी असं युक्रेनच्या राजदूताने म्हटलं आहे. आता वेळ आली आहे की, नाटोने रशियाविरोधात कारवाई केली पाहिजे, कारण रशियाचे मिसाईल कधीही इंग्लंडपर्यंत पोहोचू शकतात. पुतिन सर्वच नाटो देशांना आव्हान देऊ शकतात असं या राजदूतांनी म्हटलं आहे.
