ट्रम्प, पुतिन बैठकीनंतर आता होणार मोठा खेळ? 5 देश आले एकत्र; अमेरिका, रशियाचं टेन्शन वाढवणारी बातमी
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीनंतर आता घडामोडींना वेग आला असून, मोठी बातमी समोर आली आहे.

शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, ही बैठक रशिया आणि युक्रेमध्ये युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या बैठकीनंतर आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी आता घडामोडींना वेग आला आहे.
युरोपीयन देशांचं झेलेन्स्की यांना समर्थन मिळताना दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये होणाऱ्या या बैठकीला युपोपीयन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन, जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्क, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुट हे देखील उपस्थित राहणार आहेत. सोबतच फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या बैठकीमध्ये रशियन आक्रमणाविरुद्ध युक्रेनला पाठिंबा, युक्रेनच्या सुरक्षेची हमी आणि महत्त्वाच्या प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होईल असं यापूर्वीच जर्मनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. झेलेन्स्की यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, तसेच शांतता उपायांसंदर्भात युरोपची भूमिका सुनिश्चित व्हावी यासाठी हे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, याचाच अर्थ या सर्व देशांनी आता झेलेन्स्की यांना पाठिंबा दिला आहे.
नुकतीच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात बैठक पार पडली, त्यानंतर आता युरोपीयन देशांची चिंता वाढली आहे, युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी आता हे सर्व देश या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकीकडे पुतिन यांना युक्रेनचे दोन प्रांत डोनेत्स्क आणि लुहांस्क या दोन प्रांतावर कब्जा करायचा आहे, मात्र दुसरीकडे आम्ही आमच्या भूमिवर कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाला अतिक्रमण करू देणार नाहीत, अशी युक्रेनची भूमिका आहे. आता सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि ट्रम्प यांची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये काही तोडगा निघणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
