Donald Trump Tariff : ‘आम्ही त्यांना उघड पाडलं म्हणून…’ भारताबद्दल असं बोलतानाच ट्रम्प यांचा एक मोठा दावा
Donald Trump Tariff Issue : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र संभाळल्यापासून त्यांनी अमेरिकेच्या हिताच्या नावाखाली काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अन्य देश अडचणीत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणांचा शेअर बाजारावर होणारा परिणाम सर्वांसमोर आहेच. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केलीय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारताच्या कर रचनेवर हल्लाबोल केला. हाय टॅरिफमुळे भारतात काहीही विकणं खूप कठीण आहे, असं ट्रम्प म्हणाले. भारत आता आपल्या टॅरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला आहे, असा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच रेसिपोकल टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. यात भारताच सुद्धा नाव आहे. भारताकडून द्विपक्षीय व्यापार करारावर भर दिला जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत टॅरिफ कमी करण्यासाठी तयार झाल्याचा दावा केला. “भारत आमच्या वस्तुंवर मोठ्या प्रमाणात कर लावतो. भरपूर जास्त, त्यामुळे भारतात तुम्ही काही विकू शकत नाही. आता ते तयार झाले आहेत. ते आपल्या टॅरिफमध्ये कपात करणार आहेत. कारण कोणीतरी त्यांना उघडं पाडलय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेकडून सध्या रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची तयारी सुरु आहे. जे देश अमेरिकेच्या वस्तुंवर जास्त कर लावतात, त्या देशांच्या वस्तुंवर सुद्धा तितकाच कर लावणं म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ. 2 एप्रिलपासून लागू होणारा रेसिप्रोकल टॅरिफ हा अमेरिकेच्या व्यापार धोरणातील एक महत्त्वपूर्ण बदल असेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार भारतासह अन्य देशात मोठ्या प्रमाणात आयात कर लावून फायदा उचलला जातो, ते अमेरिका आता सहन करणार नाही.
अजून काय म्हणाले ट्रम्प ?
अमेरिकी मालावर मोठ्या प्रमाणात कर लावण्याबद्दल त्यांनी कॅनडा आणि युरोपियन संघासह अनेक देशांवर टीका केली. या देशांनी अनेक वर्षांपासून अमेरिकेचा फायदा उचलला आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. युरोपियन संघाची स्थापना ही अमेरिकेचा फायदा उचलण्यासाठी झाली आहे, असा आरोपही करण्यात आला.
भारताची रणनिती काय?
मंगळवारी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कावरुन भारतावर निशाणा साधला होता. भारत आमच्याकडून 100 टक्क्यापेक्षा जास्त ऑटो टॅरिफ वसूल करतो, असं ट्रम्प म्हणाले होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांनी कॅनडा आणि मॅक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के आणि चीनमधून येणाऱ्या सामानावर 10 टक्के टॅरिफ शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. भारत रेसिप्रोकल टॅरिफ ऐवजी अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर भर देत आहे
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल काय म्हणाले?
अमेरिकेसोबत BTA चर्चेमध्ये काय प्रगती होते? त्यावर भारतीय अधिकाऱ्यांच लक्ष आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी लाभकारी व्यापार करारावर चर्चा करण्याच्या योजनेची घोषणा केली होती असं रंधीर जयस्वाल म्हणाले.
