Pakistan Train Hijack : BLA ने अख्खीच्या अख्खी ट्रेन हायजॅक का केली? या सगळ्याच चीनशी काय कनेक्शन?
Pakistan Train Hijack : बलोच लिबरेशन आर्मीने अख्खीच्या अख्खी ट्रेन जाफर एक्सप्रेस हायजॅक केली आहे. 182 सैनिकांना बंधक बनवलं. बलोच बंडखोरांनी इतकं मोठ पाऊल का उचललं? यामागे काय कारण आहेत? ते जाणून घेऊया. बीएलएने पाकिस्तानच्या 30 पेक्षा जास्त सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे.

बलुचिस्तानात दशकभरापासून धुमसत असलेला राग पुन्हा एकदा ट्रेन हायजॅकच्या रुपाने समोर आला आहे. बलोच लिबरेशन आर्मी (BLA) आणि अन्य तीन फुटीरतवादी संघटनांनी जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली. 182 प्रवाशांना ओलीस ठेवलं होतं. आतापर्यंत या ऑपरेशनमध्ये 104 बंधकांची सुटका करण्यात आली असून 16 बलोच बंडखोर मारले गेले आहेत. BLA ने याआधी सुद्धा पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करुन हादरवलं आहे. आता त्यांनी थेट ट्रेन हायजॅक केली आहे. पाकिस्तानात सुरु असलेल्या अंतर्गत गृह युद्धाचाच हा भाग आहे. बलोच लिबरेशन आर्मीची अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याविरोधात लढाई सुरु आहे. पण आता चीन-पाकिस्तान आर्थिक फायद्यासाठी एकत्र आल्याने ही लढाई अधिक तीव्र बनली आहे.
10 वर्षांपूर्वी बलोच बंडखोरांनी चिनी गुंतवणूक आणि पाकिस्तानच्या धोरणाविरोधात संघर्षाची घोषणा केली होती. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (CPEC) हे या संघर्षामागच मूळ कारण आहे. हा इकोनॉमिक कॉरिडोर बलूचिस्तानातून जातो. चीन-पाकिस्तान मिळून बलूचिस्तानातील नैसर्गिक साधन संपत्ती हडप करत आहेत, असा BLA चा आरोप आहे. बलूच जनतेला या कॉरिडोरमुळे काही फायदा होत नाहीय, असं बलोच लिबरेशन आर्मीच म्हणणं आहे.
टॉवर्सचा वापर हेरगिरीसाठी
BLA आणि अन्य बलोच फुटीरतवादी संघटनांनी तिथे काम करणारे चिनी इंजिनिअर्स आणि कर्मचाऱ्यांवर अनेक हल्ले केले आहेत. चीनकडून लावण्यात येणाऱ्या मोबाइल टॉवर्सचा वापर हेरगिरीसाठी केला जातोय, असा तिथल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्याशिवाय बलूचिस्तानातील नैसर्गिक साधन संपत्तीचा चीनच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा योजनांसाठी वपार केला जात आहे. तेच बलोच नागरिकांना याचा काही फायदा मिळत नाहीय. म्हणूनच BLA आणि अन्य बलोच संघटना चीन आणि पाकिस्तानवर हल्ले करत आहेत.
त्यामुळे हा आक्रोश वाढत गेला
चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरची (CPEC) सुरुवात वर्ष 2015 मध्ये चिनी राष्ट्रपति शी जिनपिंग आणि तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली होती. क्षेत्रीय संपर्क, व्यापार आणि कम्यूनिकेशन उत्तम बनवणं हा या प्रकल्पामागे उद्देश होता. यात ऊर्जा, वाहतूक आणि औद्योगिक सहकार्य याचा समावेश आहे. CPEC प्रोजेक्ट अंतर्गत अनेक मोठे प्रकल्प सुरु करण्यात आले. यात करोट हायड्रोपावर प्रोजेक्ट, चायना पावर हब जेनरेशन कंपनी आणि थार एंग्रो कोल पावर प्रोजेक्ट प्रमुख आहेत. हे प्रकल्प करताना इथल्या लोकांना त्यांची जमीन आणि संसाधनांपासून वंचित ठेवलं जातय असं बलोच नेत्यांच म्हणणं आहे. त्यामुळे हा आक्रोश वाढत गेला.
