तत्काळ आणि करंट तिकीट मधील फरक काय ? तुम्हाला लगेच तिकीट कोणत्या पर्यायानी मिळेल ?
रेल्वे प्रवास हा सोयीचा प्रवासाचा पर्याय आहे. मात्र, मोठ्या लोकसंख्येमुळे तिकीट मिळवणं कधी कधी कठीण होऊ शकतं. म्हणूनच, रेल्वेने तत्काल आणि करंट तिकीट असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तर, हे तिकीट कधी आणि कसे बुक करावं ? जाणून या

भारतात रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सोयीचा आहे. पण मोठ्या लोकसंख्येमुळे तिकीट मिळणं कठीण झालंय. यासाठी रेल्वेने तत्काल आणि करंट तिकीट असे पर्याय दिले आहेत. पण यात नेमका फरक काय? कोणतं तिकीट कधी बुक करायचं? याबाबत बऱ्याच जणांना संभ्रम आहे. चला, याची सविस्तर माहिती घेऊ.
तत्काळ तिकीट म्हणजे काय?
तत्काळ तिकीट हे अचानक प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. हे तिकीट प्रवासाच्या एक दिवस आधी बुक करावं लागतं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बुधवारी प्रवास करायचा असेल, तर मंगळवारी तिकीट बुक करावं लागेल. तत्काळ तिकीटाची मर्यादा ठरलेली असते. त्यामुळे लवकर बुकिंग करणं गरजेचं आहे. हे तिकीट IRCTC च्या संकेतस्थळावर किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मिळतं. तत्काल तिकीटासाठी जास्त शुल्क आकारलं जातं, पण आपत्कालीन प्रवासासाठी हा चांगला पर्याय आहे.
करंट तिकीट म्हणजं काय?
करंट तिकीट हा आणखी एक पर्याय आहे. हे तिकीट प्रवासाच्या काही तास आधी मिळतं. जर तुम्हाला अचानक प्रवास करायचा असेल आणि तत्काल तिकीटही मिळालं नाही, तर करंट तिकीट उपयोगी आहे. हे तिकीट रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर किंवा टीटीई (ट्रेन टिकीट परीक्षक) कडून मिळतं. पण यासाठी गाडीत जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे. करंट तिकीट सहसा गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत मिळू शकतं.
तत्काल आणि करंट तिकीट यातला फरक
बुकिंग वेळ: तत्काळ तिकीट एक दिवस आधी बुक होतं, तर करंट तिकीट प्रवासाच्या काही तास आधी मिळतं.
उपलब्धता: तत्काळ तिकीटाची मर्यादा निश्चित असते, तर करंट तिकीट जागा रिक्त असल्यावरच मिळतं.
प्रक्रिया: तत्काळ तिकीट ऑनलाइन किंवा खिडकीवर बुक करता येतं, तर करंट तिकीट फक्त स्थानकावर किंवा टीटीईकडून मिळतं.