कुटुंबातील 5 जणांना प्रवास करायचाय, पण तिघांचेच तिकीट कन्फर्म, बाकीचे दोघे कसा प्रवास करतील?
कुटुंबासोबत रेल्वे प्रवास करताना तिकीट कन्फर्म नसण्याची समस्या अनेकांना येते. भारतीय रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवेश मिळत नाही. अशावेळी RAC मध्ये रूपांतर किंवा जनरल तिकीट घेणे हे पर्याय आहेत. IRCTC वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास आपोआप रद्द करते आणि पैसे परत करते.

भारतात रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. लोकलपासून एक्सप्रेस सर्वांचाच प्रवासासाठी लोक वापर करतात. स्वस्तात, आरामदायी आणि चांगला प्रवास होत असल्याने प्रत्येकाची पहिली पसंत ही रेल्वेच असते. लोकलचं तिकीट सहज मिळतं. त्यामुळे प्रवासही सोपा होतो. पण लांबपल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट मिळणं मुश्किल होतं. त्यामुळे लोक आधीच बुकिंग करतात. काही वेळेला सर्व तिकीट कन्फर्म मिळतात. तर काही वेळा पाच लोकांना जायचं असेल तर तिघांचेच तिकीट कन्फर्म होतात. दोघे वेटिंगवर असतात. अशावेळी पंचायत निर्माण होते. दोघांना न्यायचं कसं? असा यक्ष प्रश्न पडतो. कारण तिकीट कन्फर्म नसताना दोघांना घेऊन गेलं तर फाइन बसण्याची भीती वाटते. त्यामुळे मग नक्की काय करायचं? असा सवाल निर्माण होतो.
काय करायचं?
जेव्हा तुम्ही एकाच बुकिंगवर पाच तिकीट घेता, तेव्हा तुमचा पीएनआर नंबर जनरेट होतो. पीएनआर नंबर हा तुमच्या सर्व तिकीटांच्या माहितीचं रेकॉर्ड असतं. यात कोण कोण प्रवास करत आहे? कोणत्या ट्रेनने प्रवास करत आहे? सीट नंबर आणि कोच, तसेच प्रवासाची तारीख आणि कोणत्या क्लासमधून प्रवास करणार ही सर्व माहिती त्यात असते. जर तुम्ही पाच लोकांचं तिकीट बुक केलं तर त्यातील काही लोकांचं तिकीट कन्फर्म होतं. तर काही लोक वेटिंग लिस्टमध्ये जातात. पूर्वीच्या नियमाप्रमाणे पीएनआरवर काही तिकीट कन्फर्म झाले आणि काही वेटिंगवर असेल तर सर्व लोक ट्रेनमध्ये बसू शकत होते. वेटिंग लिस्टमधील व्यक्तीला सीट मिळाली नाही तरी ते ट्रेनमधून प्रवास करू शकत होते. टीटीई त्यांना ट्रेनमधून उतरवत नव्हता. पण आता रेल्वेचे नियम बदलले आहेत.
नवे नियम काय आहेत?
नव्या नियमानुसार, ज्यांचं तिकीट कन्फर्म आहे, तेच लोक प्रवास करू शकतात, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. वेटिंग लिस्टमधील प्रवासी स्लीपर किंवा एसी कोचमध्ये चढू शकत नाही. चार्ट बनल्यानंतरही तुमचं तिकीट वेटिंगमध्ये असेल तर त्या डब्यातून तुम्ही प्रवास करू शकत नाही. तिकीट कन्फर्म नसताना तुम्ही रेल्वेत चढला तर टीटीई तुम्हाला ट्रेनमधून उतरवेल. किंवा तुम्हाला आर्थिक दंड ठोठावेल नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
5 पैकी तीनच तिकीट कन्फर्म असेल तर काय करावं?
कुटुंबात जर पाच लोकांना प्रवास करायचा आहे. पाच तिकीट बुकिंग केली आणि तीनच कन्फर्म झाले असतील आणि दोन वेटिंगमध्ये असतील तर तुमचं तिकीट RAC मध्ये कन्व्हर्ट केल्यास तुम्ही ट्रेनमध्ये चढू शकता. RACचा अर्थ तुमची सीट कुणासोबत तरी शेअर होईल. तिकीट चार्ट बनल्यानंतरही वेटिंगमध्ये असेल तर तुम्ही थेट ट्रेनमध्ये नाही चढू शकत. तुम्ही स्टेशनवर जाऊन जनरल तिकीट खरेदी करू शकता. यूटीएस अॅपवरून तुम्ही जनरल तिकीट खरेदी करू शकता. तिकीटाशिवाय किंवा तिकीट वेटिंगवर असताना प्रवास केल्यास टीटीई तुमच्यावर कारवाई करू शकतात.
IRCTC आणि वेटिंग तिकीट
तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं असेल आणि ते कन्फर्म झालं नाही तर आयआरसीटीसी ते तिकीट ऑटो कॅन्सल करते. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात. म्हणजेच तुम्हाला स्वत:हून तिकीट कॅन्सल करण्याची गरज नाही. जर ट्रेनमध्ये एखाद्या प्रवाशाने प्रवास रद्द केला आणि सीट खाली असेल तर टीटीई एखाद्या वेटिंगवर असलेल्या प्रवाशाला सीट देऊ शकतो.
