राजस्थानात स्वाईन फ्ल्यूचं थैमान, 40 दिवसात 107 जणांचा मृत्यू

राजस्थानात स्वाईन फ्ल्यूचं थैमान, 40 दिवसात 107 जणांचा मृत्यू

नई दिल्ली : राजस्थानात स्वाईन फ्ल्यूने अक्षरश: थैमान घातलं आहे. 1 जानेवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2019 या 40-41 दिवसांच्या कालावधीत तब्बल 107 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राजस्थानातील विविध जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्ल्यू पसरला असून, स्वाईन फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, दिवसागणिक स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढताना दिसते आहे.

राजस्थान सरकारने राज्यभरात 12 जागी स्वाईन फ्ल्यू रोखण्यासाठी उपाययोजना आणि माहितीसाठी केंद्र सुरु केले आहेत. असे आणखी केंद्र सुरु करण्यासाठी राजस्थान सरकार प्रयत्न करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात राजस्थानात सर्वाधिक मृत्यू स्वाईन फ्ल्यूने झाले आहेत. राजस्थानपाठोपाठ गुजरात, पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो.

‘एच-1-एन-1’द्वारे स्वाईन फ्ल्यू एका माणसातून दुसऱ्या माणसांपर्यंत पसरतो. स्वाईन फ्ल्यूच्या पसरण्याचा वेग जास्त असल्याने साथही त्वरीत पसरते. साथीचा ताप, खोकला, अंगात थकवा इत्यादी लक्षणं स्वाईन फ्ल्यूची मानली जातात.

स्वाईन फ्ल्यूपासून बचावासाठी काही टिप्स :

  • खोकला आल्यास तोंडावर हात किंवा रुमाल ठेवावा.
  • सातत्याने हात धुवावा, जेणेकरुन स्वाईन फ्ल्यूपासून वाचण्यास मदत होते.
  • हँड सॅनिटायजर स्वत:कडे ठेवल्यास उत्तम.
  • फल, भाजी पाण्याने धुवावेत.
  • गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळावं. गेलातच तर तोंडावर मास्क लावावा.
  • स्वाईन फ्ल्यूचं अगदी प्राथमिक लक्षण दिसून आलं, तरी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Published On - 7:48 pm, Sun, 10 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI