अवकाळी पावसाचा कहर, देशभरात 35 ते 40 जणांचा मृत्यू

अवकाळी पावसाचा कहर, देशभरात 35 ते 40 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासात अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे देशभरात तब्बल 35 ते 40 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकट्या मध्य प्रदेशात तब्बल 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात 11 आणि राजस्थानातील 7 जणांचा अवकाळी पावसाने बळी घेतला.  इकडे महाराष्ट्रातील बुलडाण्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी आहेत.

राजस्थान, मध्य प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांत अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात पुन्हा वादळी-वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या वादळी-वाऱ्याचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. दुष्काळापासून त्रस्त शेतकरी या अस्मानी संकटामुळे पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.


गुजरातमध्ये या वादळी वाऱ्यामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये आलेल्या या नैसर्गिक संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं. “गुजरातमध्ये आलेल्या वादळी-वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचं मला दु:ख आहे. मी प्रार्थना करतो की, जखमी लवकरात लवकर बरे होतील” असं ट्वीट मोदींनी केलं. याशिवाय मोदींनी पीडितांना मदत जाहीर केली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मोदींनी जाहीर केली.

मध्य प्रदेशातही या अस्मानी संकाटामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनींही ट्विटरवर या नैसर्गिक संकटाबाबत दु:ख केलं. “वीज पडल्याने इंदूर, धार आणि मध्य प्रदेशातील इतर काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचं समोर आलं आहे. पीडितांसाठी मी दु:ख व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत आमचं सरकार पीडितांसोबत आहे”, असं ट्वीट मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं.

मध्य प्रदेश आणि गुजरातशिवाय, राजस्थानच्या प्रतापगड आणि झालावड भागातही वादळी-वाऱ्यामुळे लोकांचं जीवन अस्ताव्यस्त झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली, विजेचे खांब पडले. राजस्थानात आतापर्यंत यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये 2, हरियाणा 1, झारखंड 1, महाराष्ट्र 1, उत्तर प्रदेश 1 आणि हिमाचल प्रदेशमध्येही एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून आज आणि उद्या पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI