ऐकावं ते नवलच! मिशी कापल्याने सलून चालकावर गुन्हा दाखल

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jul 18, 2019 | 8:36 AM

परवानगी शिवाय मिशी कापणं सलून चालकाला चांगलंच महागात पडलं. नागपूरच्या कन्हान येथे न विचारता मिशी कापली म्हणून एका सलून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐकावं ते नवलच! मिशी कापल्याने सलून चालकावर गुन्हा दाखल

नागपूर : “मुंछे हो तो नत्थुलाल जैसी हो… वरना ना हो’ महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’ सिनेमातील हा डायलॉग आजही तितकाच प्रसिद्ध आहे. जर खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासाठी मिशीचं इतकं महत्त्व असेल, तर मग सामान्य माणसांसाठी का नाही. आजकाल तर मिशी-दाढी ठेवणं हा एक ट्रेंड झाला आहे. अनेक तरुण मिशी आणि दाढी ठेवतात. अशाच एका व्यक्तिच्या प्रिय मिशीवर सलून चालकाने वस्तरा चालवला. मग काय, मिशी कापल्याने संतापलेल्या व्यक्तीने थेट पोलीस ठाणे गाठून या सलून चालकाविरोधात तक्रार दाखल केली.

परवानगी शिवाय मिशी कापणं सलून चालकाला चांगलंच महागात पडलं. नागपूरच्या कन्हान येथे न विचारता मिशी कापली म्हणून एका सलून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीच्या तक्रारीवरुन कन्हान पोलिसांनी सलून चालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरू केला आहे. पोलीस ठाण्यात अशा प्रकारची ही पहिलीच तक्रार आहे, त्यामुळे या सलून चालकावर काय कारवाई करायची या संभ्रमात सध्या पोलीस आहेत. पुरुषांसाठी मिशीचं किती महत्त्व असतं हे या घटनेवरुन दिसून येतं. सध्या कन्हान परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

कन्हान येथील शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर हे मंगळवारी (16 जुलै) सुनील लक्षणे यांच्या फ्रेण्ड्‌स जेन्टस्‌ पार्लरमध्ये मिशी आणि दाढी व्यवस्थित करण्यासाठी गेले. येथे सुनील लक्षणे यांनी किरण ठाकूर यांना काहीही न विचारता थेट त्यांच्या मिशीवर वस्तरा चालवला. त्यानंतर किरण ठाकूर घरी गेले. मिशी कापली याचा राग आधीच किरण ठाकूर यांच्या मनात होता, त्यातच नातेवाईकांनीही त्यांना यावरुन हटकलं. त्यानंतर किरण ठाकूर यांनी सलून मालक लक्षणे यांना फोन केला. तू न विचारता माझी मिशी का कापली? असा सवाल ठाकूर यांनी लक्षणे यांना केला. त्यावर कापल्या असतील तुला जे करायचे ते कर, असं उत्तर लक्षणे यांनी दिलं. त्यामुळे ठाकूर आणि लक्षणे यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि हे प्रकरण थेट कन्हान पोलिसांत पोहोचलं.

केवळ वादावरुन गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी दोघांचीही समजून काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या किरण ठाकूर यांनी न विचारता मिशी कापल्याची तक्रार दिली आणि पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI