ऑफिसच्या एसीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अधिक थंडी का वाजते?

एसी ऑफिसमध्ये काम करताना महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक थंडी वाजत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. यामागील कारण जाणून घेणं रंजकतेचं ठरणार आहे

ऑफिसच्या एसीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अधिक थंडी का वाजते?

मुंबई : उन्हाळा असो किंवा पावसाळा, ऑफिसमध्ये दिवसभर एसी (Office AC) मध्ये काम करताना काही जणांना थंडी वाजत असल्याचं आपण नेहमी पाहतो. त्यातही, महिला सहकाऱ्यांना तुलनेने अधिक थंडी जाणवत असल्याचं, तुम्हीही पाहिलं असेल. याचं कारण तुम्हाला माहित आहे का? महिलांना अधिक थंडी वाजण्यामागील कारणांचा शोध घेताना, काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत.

ऑफिसमध्ये तापमान कमी झालं, की महिला आपली जॅकेट्स, स्वेटर, स्कार्फ, स्टोल लगेच बाहेर काढताना तुम्ही पाहत असाल. बऱ्याचदा पुरुष महिलांना ‘काय तुम्हाला लगेच थंडी वाजते’ असं म्हणून चिडवतही असतील. मात्र यामागे जीवशास्त्रीय कारण आहे. म्हणजेच पुरुष आणि महिला यांच्या शरीरात असलेला मूलभूत फरक.

आपले हात आणि पाय बर्‍याच वेळा आधी थंड पडतात. जर आपले हात-पायाचे तळवे थंडगार असतील तर आपणास थंडी जाणवते.

सर्वेक्षणात काय आढळलं?

तापमान आणि स्त्री-पुरुष यांच्या कार्यक्षमतेतील फरक याचा अभ्यास करण्यासाठी 500 जणांना सहभागी करण्यात आलं. त्यांचे 24 ग्रुप तयार करण्यात आले. 61 अंश फॅरेनहिट (16.66 अंश सेल्सिअस) ते 91 अंश फॅरेनहिट (32.78 अंश सेल्सिअस) अशा वेगवेगळ्या तापमानात त्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली.

तापमान अधिक असेल, तर महिला ऑफिसमध्ये अधिक चांगला परफॉर्मन्स देतात, ही बाब संशोधनात समोर आली आहे.  म्हणजेच तापमान वाढल्यावर कामातील त्यांचा वावर सहज होतो, तर तापमान घटत गेल्यावर वाजणाऱ्या थंडीमुळे त्यांच्या  कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्या उलट. पुरुष कमी तापमानात चांगलं परफॉर्म करत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

शारीरिक रचना हेच कारण

महिलांची शारीरिक रचना हे त्यांना अधिक थंडी वाजण्याचं महत्त्वाचं कारण आहे. महिलांची चयापचय शक्ती (Metabolism Rate) कमी असते. त्यामुळे त्यांच्या शरीरात कमी उष्णता निर्माण होते आणि शरीरांतर्गत कमी ऊब राहते. शरीराचा आकार, वजन, हार्मोन्स अशा बाबत लैंगिक विविधता आढळते. स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या स्नायूंना अधिक घनता असल्याने उष्णता निर्माण होण्यास मदत होते.

स्त्री-पुरुष भेद

आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांश कार्यालयांमधील एसी हा पुरुषांच्या तापमानानुसार सेट केलेला असतो. महिलांसाठी 25 अंश सेल्सिअस हे काम करण्यासाठी योग्य तापमान असल्याचं मानलं जातं. तर पुरुष 22 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानापर्यंत स्वतःला व्यवस्थित अॅडजस्ट करु शकतात.

म्हणून हुडहुडी भरते

माणसाच्या शरीराचं सर्वसामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस इतकं असल्याचं शाळेत तुम्ही वाचलं असेलच. जेव्हा आपल्याला गरम होतं, तेव्हा आपल्या त्वचेतील रक्तवाहिन्या त्वचेद्वारे उष्णता सोडण्यासाठी विलंब करतात. यामुळे त्वचेला घाम फुटतो. उलट, जेव्हा आपल्याला थंड वाटतं, तेव्हा आपल्या त्वचेतील रक्तवाहिन्या उष्णता वाचवण्यासाठी आकुंचित पावतात. उष्णता निर्माण करण्यासाठी आणि शरीराचे तापमान सुरक्षित ठेवण्यासाठी आपले स्नायू वारंवार थरथरतात (म्हणूनच जास्त थंडी वाजली की तुम्हाला कापरं भरतात, किंवा हुडहुडी भरते)

वय, हालचाली, आजार, गर्भधारणा आणि हार्मोन्स अशा अनेक गोष्टी आपल्या मूळ तपमानावर परिणाम करु शकतात. अर्थात ही तुलना सरसकट सर्व स्त्रिया आणि पुरुषांमध्ये करता येणार नाही. मात्र सर्वेक्षणांच्या आधारे केलेलं निरीक्षण आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI