इच्छामरणाची परवानगी मागणाऱ्या तरुणाच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

इच्छामरणाची परवानगी मागणाऱ्या तरुणाच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

पुणे : आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी या तरुणाने केली. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची दखल घेत या तरुणाचे मन वळवण्याचे पोलिसांना आदेश दिले आणि पुणे पोलिसांनाही या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळण्यात यश आलंय.

पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणारा एक 32 वर्षाचा तरुण.. चांगली नोकरी, चांगल्या परिसरात स्वतःचे घर मात्र .. तरीही या तरुणाला कुणी लग्नासाठी मुलगी देत नाही. आपल्या आजारी असणाऱ्या आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार आपल्याला मिळावी हा त्याचा हट्ट आहे. त्यामुळे आलेले सर्वच स्थळं त्याला नाकारत असत. शेवटी नैराश्यात येऊन त्याने चक्क मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची दखल घेत या तरुणाचे मन वळवण्यासाठी पुणे पोलिसांना आदेश दिले. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी या तरुणाला शोधून त्याची भेट घेतली, त्याची समजूत काढली. यावेळी पोलिसांमधील माणूस समोर आला. आजच्या या धकाधकीच्या जीवनात.. अगदी छोट्या मोठ्या कारणांनी नैराश्यात येऊन अनेक तरुण आत्महत्येचा मार्ग निवडतात. मात्र अशा नैराश्यात अडकलेल्या तरुणांना नुसतेच पोलिसच नाही, तर तुम्ही आम्ही भरोसा देण्याची गरज आहे.

संबंधित तरुण एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे, चांगला पगार आहे. त्याच्या आईला पार्किन्सन्सचा आजार असून वडील 85 वर्षांचे झाले आहेत. ऑफीसचं काम आणि आई-वडिलांची जबाबदारी हे एकट्यालाच बघावं लागतं. घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणीतरी हातभार लावावा हा विचार करून लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली. बहुतांश मुलींनी त्याला त्याच्या आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. आई-वडिलांना सोडून जाणे शक्य नसल्याने या तरुणाने चांगली संधी असलेल्या इतर राज्यातील नोकऱ्यांकडे पाठ फिरवली. आपलं दु:ख सांगायचं कोणाला या विवंचनेत सापडलेल्या या तरुणाने अनेकदा आत्महत्येचाही विचार केला. पण आत्महत्या हा गुन्हा आहे हे माहित झाल्यानंतर त्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती.

Published On - 9:00 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI