जयंत पाटलांच्या भाषणावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसची आज औरंगबादमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती (Minister Jayant Patil).

जयंत पाटलांच्या भाषणावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणाबाजी

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसची आज औरंगबादमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती (Minister Jayant Patil). प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला हजर होते. ते भाषण करत असताना अचानक सभागृहात गदारोळ सुरु झाला. त्यांच्या भाषणादरम्यान काही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते सभागृहात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली (Minister Jayant Patil).

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढत गेटवर सोडले. त्यानंतर गेटवरही या मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

घोषणाबाजीचं कारण काय?

“गेल्या 40 दिवसांपासून आमचे काही बांधव आपला संसार, घरदार सोडून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. तरी सरकारमधील एकही मंत्री त्यांच्याकडे गेलेले नाहीत. त्यामुळे आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने रोखठोक भूमिका घेतली आहे. यानंतर जो कुणी मंत्री, आमदार, खासदार आमच्या मतदारसंघात फिरणार त्याला आम्ही जाब विचारणार”, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

“मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या बोलवून घेतलं आणि तीन तास गाडीत ठेवलं. त्यानंतरही मुख्यमंत्री साहेबांनी आंदोलकांची भेट घेतली नाही. याचा अर्थ काय? तुम्ही मराठा समाजाच्या नावावर जिंकून यायचं, सत्ता स्थापन करायची आणि सत्ता स्थापन झाल्यावर दुर्लक्ष करायचं. यापुढे असं कदापी चालणार नाही. आता आम्ही आमदार आणि खासदारांसाठी गावबंदी आणि जिल्हाबंदी करणार आहोत”, असं घोषणाबाजी करणारे मराठा कार्यकर्ते म्हणाले.

जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

दरम्यान, जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना कार्यकर्त्यांना अनेक सूचना दिल्या. “औरंगाबादच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने आपण लढवायची आहे. फक्त उभं राहायचं म्हणून उभं राहायचं नाही, तर जिंकून येण्यासाठी उभं राहायचं आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहून पक्षाला अधिक बळकटी द्यायचं काम करावं”, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

मराठा आंदोलकांच्या काय आहेत मागण्या?

मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये नियुक्ती देण्यात यावी, अशी मराठा आंदोलकांची मागणी आहे. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार 9 जुलै 2014 ते 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीत जाहिराती, नियुक्त्या, प्रवेश हे कलम 18 प्रमाणे संरक्षित आहेत. त्यामुळे कलम 18 अंतर्गत नियुक्ती देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांची आहे.

संबंधित बातमी : मराठा समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु : संभाजीराजे

Published On - 1:14 pm, Sat, 7 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI